“जागतिक आरोग्य संघटनेच्या नादाला लागूनच करोना वाढला आहे,” असं मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यविषयक असलेल्या माहितीबद्दल कौतुक केलं होतं. एबीपी माझावर आयोजित ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात या विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

आणखी वाचा- महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्रं आहेत का? संजय राऊत म्हणतात…

“जागतिक आरोग्य संघटनेच्या नादालाच लागून करोना वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेत इतूनतिथून गोळा केलेली लोकं आहेत. नुकतीच रशियाची लस आली. जागतिक आरोग्य संघटना त्यांच्या विरोधात बोलली. परंतु रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्यांच्या मुलीला ती लस दिलीच,” असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. धारावीमध्येही आता करोनाची परिस्थितीत नियंत्रणात आहे. मुंबईतही करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तर त्यामुळे त्यांना याचं श्रेय दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- सुशांत प्रकरणी जे बोंबलत आहेत त्यांना बोंबलू द्या!- संजय राऊत

सुशांत प्रकरणावरही वक्तव्य

“सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात जे बोंबलत आहेत त्यांना बोंबलू द्या!,” असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. “दीड दमडीच्या भाजपाच्या बिहारमधल्या लोकांनी आमच्यावर शिंतोडे उडवले त्याला आम्ही किंमत देत नाही. हिटलरकडे एक गोबेल्स होता, भारतात १० हजार गोबेल्स आहेत. मी माझ्या लेखात जी भूमिका घेतली ती योग्य आहे. ते माझं कर्तव्य आहे. काही लोक सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एक अजेंडा घेऊन चालले आहेत. मुंबई पोलिसांची प्रतीमा या लोकांनी मलीन केली,” असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे.