पश्चिम विदर्भातील खासदार व जिल्हाप्रमुखांनी ‘मातोश्री’वर निवेदन दिल्याचा दावा

नितीन पखाले, यवतमाळ</strong>

दिग्रसचे आमदार संजय राठोड यांना महाविकास आघाडीमध्ये मंत्रीपद दिल्याने पश्चिम विदर्भातील शिवसेना खासदार भावना गवळी, खा. प्रतापराव जाधव यांच्यासह इतर आमदार व जिल्हाप्रमुख नाराज आहेत. पश्चिम विदर्भातील मंत्रिमंडळातील संभाव्य आमदारांच्या नावाबाबत ‘मातोश्री’वर लेखी निवेदन देऊ नही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. ही बाब जिव्हारी लागल्याने यवतमाळ- वाशीमच्या खासदार भावना गवळी चांगल्याच भडकल्या. एका खासगी प्रादेशिक वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राठोड यांच्या नियुक्तीवरून त्यांनी थेट पक्षालाचा आव्हान दिल्याचे दिसते.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पश्चिम विदर्भातून आ. संजय रायमूलकर किंवा आ. गोपिकिशन बाजोरिया यांना स्थान मिळावे, ही आमची मागणी होती. तशा पद्धतीचे लेखी निवेदनच पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण स्वत: आणि खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रायमुलकर, आ. गोपिकिशन बाजोरिया, आ. संजय गायकवाड आणि सर्व जिल्हाप्रमुखांनी दिल्याचा दावा खा. गवळी यांनी या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. पक्षातील कोणाला मंत्रीपद मिळावे, याबाबत पश्चिम विदर्भातील अनेक नेत्यांचे बहुमत असताना पद दुसरीकडे जात असेल तर त्यासंदर्भात आमची निश्चितच नाराजी आहे, अशी स्पष्ट भूमिका खा. गवळी यांनी मांडली आहे.

खा. गवळी यांच्या या भूमिकेचे तीव्र पडसाद शिवसेनेत उमटले आहेत. गवळी या यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना त्या या दोन जिल्ह्याबाहेरील आमदाराला मंत्रीपद द्या, अशी मागणी कशी करू शकतात, असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी खा. गवळी यांच्यासोबत वाशीमच्या एका जिल्हाप्रमुखाचा अपवाद वगळता अन्य कुणीही जिल्हाप्रमुख नव्हते, हे आपण अनेकांशी प्रत्यक्ष बोलून स्पष्ट केले, असा दावा ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. यवतमाळ जिल्ह्यातील तीनही जिल्हाप्रमुख आणि विदर्भातील काही जिल्हाप्रमुख व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राठोड यांना मंत्री व यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्याचा पालकमंत्री करा म्हणून पक्षप्रमुखांकडे विनंती केली होती, असे ते म्हणाले. आपण स्वत: व जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड, संजय राठोड यांच्या शपथविधीला मुंबईत उपस्थित होतो, असेही त्यांनी सांगितले. खा. गवळी यांचे हे बालिश राजकारण असल्याचा टोलाही पिंगळे यांनी मारला. यासंदर्भात खा. भावना गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश प्राप्त झाला.

गवळी व राठोड यांच्यात वर्चस्ववाद

युती सरकारमध्ये संजय राठोड प्रारंभी यवतमाळ व नंतर वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री होते. खा. गवळी या दोन्ही जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. संजय राठोड यांच्या संघटन कौशल्यामुळे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांची एक मोठी फळी त्यांच्यामागे निर्माण झाली. संजय राठोड यांनी यवतमाळ, वाशीम जिल्हा प्रमुखांची नियुक्ती आपल्याला विश्वासात न घेता केल्याचा आरोप गवळी यांनी केला होता. येथूनच या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आणि जिल्ह्यात शिवसेनेत दोन गट तयार झाले. हा वाद तीन वर्षांत अनेकदा ‘मातोश्री’वर गेला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गवळी आणि राठोड यांना समज देऊ न समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोन्ही नेत्यांमधील वाद आता वैयक्तिक द्वेषापर्यंत पोहचल्याचे खा. गवळी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. भविष्यात हा राजकीय डाव कसा रंगतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.