माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर संयमाचा बांध फुटतो. हे कायद्याचे राज्य, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हल्लेखोरांवर कारवाई केलीय. राजकीय भांडवल करू नये, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे. मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी शिवसेनेवर टीका सुरु आहे. त्यावरच संजय राऊत यांनी ट्विटरवरुन एका निवेदनाद्वारे शिवसेनेची भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात कोणीही घेऊ नका. ते खपवून घेतले जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्याच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त आणि तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राऊत यांचं निवेदन –
महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारित केलेले छायाचित्र बदनामीकारक असले तरी त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त तितकीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षानं याचं राजकीय भांडवलं करणं दुर्देवी आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे.पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांच्या संयमाचा बांध फुटतो. म्हणून सगळ्यांनी जबाबदारीनं एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे. समाजात अशांतता व तणाव निर्माण होऊ न देणे हे सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचेही कर्तव्य आहे.

दरम्यान, निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. कांदिवली पश्चिम येथे ही मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज शुक्रवारी व्हायरल झालं होतं. यानंतर भाजपा नेत्यांनी शिवसेनवेर टीका करत कारवाईची मागणी केली होती.