शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सहकुटुंब आणि लोकसभा निवडणुकीत जनतेने निवडून दिलेल्या शिवसेनेच्या खासदारांसह कार्ला गड येथील एकवीरा आईचे दर्शन घेतले. मोठ्या जल्लोष्यात वाजतगाजत उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आदी उपस्थित होते. एकविरा आईच्या पायऱ्या चढत मुख्य मंदिरापर्यंत ठाकरे कुटुंब चालत गेले. खासदारासह त्यांनी एकविराच्या मंदिरात जाऊन खणानारळाने ओटी भरून दर्शन घेतले.

शिवसेना आणि भाजपा युतीला लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाले असून निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब एकविरा आईच्या दर्शनाला आले होते. तेव्हा, त्यांनी शिवसेना भाजपा युतीला भरघोस यश मिळू दे, अशी प्रार्थना केली होती. शिवसेनेची पुढील वाटचाल आणि यशासाठी आशीर्वाद मागायला आलो असल्याचे ठाकरे तेव्हा म्हणाले होते. त्यानुसार शनिवारी अठरा खासदारासह आई एकविरेचे ठाकरे यांनी सहकुटुंब दर्शन घेतले. परंतु, त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.

यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, खासदार भावना गवळी, धैर्यशील माने,  गजानन कीर्तिकर, श्रीरंग बारणे, विनायक राऊत, सदाशिव लोखंडे, अनिल देसाई, राजन विचारे, श्रीकांत शिंदे सह अठरा खासदारांनी सपत्नीक उपस्थित दर्शवत आई एकविरा देवीचे आशीर्वाद घेतले.