शेतकरी कर्जमाफीतील अनागोंदी कारभार शिवसेना आमदारानेच उघड केला आहे. शिवसेना आमदार प्रकाश आबीटकर यांच्या खात्यात कर्जमाफीचे २५ हजार रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे अर्ज न करताही आबीटकर हे कर्जमाफीचे ‘लाभार्थी’ ठरले असून खुद्द आबीटकर यांनी विधिमंडळात ही  माहिती दिली.

राज्य सरकारने जूनमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यालाच त्याचा लाभ मिळाला पाहिजे, बोगस शेतकरी दाखवून कुणाला त्याचा गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी अर्ज स्वीकारण्यापासून ते कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. मात्र, लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील आमदार प्रकाश आबीटकर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे कर्जमाफीतील घोळ उघड केला. ‘मी कर्जमाफीसाठी अर्ज केलाच नव्हता, मात्र तरीदेखील माझे नाव लाभार्थ्यांच्या यादीत होते. यात भर म्हणजे कर्जमाफीचे २५ हजार रुपये माझ्या बँक खात्यात जमा देखील झाले’ असे त्यांनी सांगितले. बँका अपात्र लोकांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करत असतील तर हा एक मोठा घोटाळा देखील असू शकतो, असे त्यांनी सांगितले. याशिवाय शिक्षक आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली, असा आरोप करत त्यांनी काही नावे देखील जाहीर केली. आबीटकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची सरकारने दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. सहकार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला ही ‘चूक’ कशी झाली याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि महापालिकेतील नगरसेवकांना कर्जमाफी मिळणार नाही, असे राज्य सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. मात्र त्यानंतरही आबीटकर यांना कर्जमाफी कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नावामुळे हा घोळ झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मात्र प्रकाश आबीटकर यांना कर्जमाफी मिळालेली नाही, असा दावा केला. प्रकाश आबीटकर नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली, मात्र ती व्यक्ती आमदार प्रकाश आबीटकर नाही. आबीटकर आडनाव असलेली ६७ बँक खाती असल्याचे पाहणीतून समोर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी देण्याच्या लोकभावनेच्या दबावातून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीत सुरुवातीस आमच्याकडूनही काही चुका झाल्या. चुकीच्या लाभार्थ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली होती.