उंदीर घोटाळ्यावरुन शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. उंदीर हा शेतकऱ्यासोबतच ‘घोटाळेबाजांचाही मित्र’ असल्याचे उघड झाले आहे. उंदीर घोटाळ्याने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नसून पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहे. राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले असून ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी भाजपाची आहे. अन्यथा राज्यातील जनता पिंजरा लावून बसलीच आहे, अशा शब्दात शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला.

उंदीर घोटाळ्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात ‘उंदीर घोटाळा’ झाल्याचा स्फोट केला. त्यामुळे देशभरातील घोटाळ्यांमध्ये आणखी एका घोटाळ्याची आणि त्याच्या सुरस कथेची भर पडली. खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळयाचा स्फोट केला हे त्यांनाच माहीत, पण यानिमित्ताने सरकारी तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते आणि उंदीर हे ‘कार्य’ करू शकतात, हे उघड झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

राज्याच्या इतर भागातील उंदरांनाही मंत्रालयातील उंदरांचा हेवा वाटतोय. मंत्रालयात आपली निदान डेप्युटेशनवर नेमणूक व्हावी अशी त्यांची इच्छा असून सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेश काढावा यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही समजते, असे सांगत शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला.

‘कागदी घोडे’ असा शब्द सरकारी कामकाजासंदर्भात वापरला जातो. त्याची जागा ‘कागदी उंदीर’ हा शब्द घेईल, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. उंदीर घोटाळ्याने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नसून विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत. तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत. मंत्रालयाची जमीन भुसभुशीत झाली असून मंत्रालयात धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांना थारा दिला जात नसला तरी दलाल आणि उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. सरकारी तिजोरीतील ‘लोणी’ उंदरांच्या नावाने भलतेच ‘बोके’ खात आहेत, असे आरोप भाजपाचे लोकंच करत आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय हे‘ उंदरालय’ झाले आहे. ‘अमुक-तमुक मुक्त’ करण्याची भाषा करणाऱ्यांच्या राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे, असा इशारा सेनेने दिला.