पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. पंतप्रधानांनी भाषण करताना डोक्यावर भगवा फेटा घातला हे कौतुकास्पद असले तरी पुण्यात सुरू झालेले ‘पगडी’चे राजकारण आता लाल किल्ल्यापर्यंत पोहोचल्याचे दिसते. पण डोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का? अयोध्येत राममंदिराचे काय होणार?, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ७२ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन भाषण केले. या भाषणाचा गुरुवारी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला. मोदी यंदा काय बोलणार याची फार उत्सुकता तशीही नव्हती, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला असून मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन पाच भाषणे केली आणि साधारणत: यंदाच्या भाषणातही तेच विषय होते. मोदी यांची भाषणे म्हणजे आकडे, घोषणा व योजनांची आतषबाजी असते व त्यासाठी लाल किल्ल्याचे प्रयोजन केले जाते, अशी टीकाही शिवसेनेने केली.

मोदी यांनी यंदा भाषण करताना डोक्यावर भगवा फेटा घातला. पण डोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का? अयोध्येत राममंदिराचे काय होणार? यावर पंतप्रधानांनी भाष्य केले असते तर लाल किल्लाही रोमांचित झाला असता, असे शिवसेनेने म्हटले आहे. शेतकरी आत्महत्या करतोय व देशातील सर्वच जाती ‘मागासवर्गीय’ म्हणून नोकरीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. जनतेने प्रामाणिकपणे भरलेल्या करांची लूट करून नीरव मोदीसारखे उद्योगपती पळून गेले ही देशाची लूट आहे. करदात्यांच्या पैशांतून पंतप्रधान परदेश दौरे करतात व चार हजार कोटीवर भाजपच्या जाहिरातबाजीवर खर्च झाले, जनतेच्या योजनांचाच पैसा त्यात उडाला, अशी टीका शिवसेनेने केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena slams pm narendra modi independence day 2018 speech at red fort
First published on: 16-08-2018 at 07:44 IST