‘गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी. अण्णांचा जीव महत्त्वाचा असून सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

अण्णा हजारेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल उद्धव यांनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी अण्णांच्या आमरण उपोषणाला शुभेच्छा देणारे पत्र पाठवावे हा प्रकार संतापजनक , तितकाच हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘अण्णांचा लढा भ्रष्टाचारविरोधी आहे व देशाचीच ती समस्या आहे. पण आमरण उपोषण करुन प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरुन लढा द्यावा व देशाला जाग आणावी. सध्या देशातील जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून जनतेला त्या गुंगीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी. गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हरिद्वारला प्रा. अग्रवाल उपोषणास बसले व त्यांच्या उपोषणाची दखळ न घेता त्यांना मरु दिले. देशाची गंगा शुद्ध करण्यासाठी अण्णांनी उपोषण सोडावे व लढा उभारावा. जेथे शक्य आहे तेथे शिवसेना अण्णांना सोबत केल्याशिवाय राहणार नाही’, असे उद्धव ठाकरे यांनी शेवटी सांगितले.

अण्णांची प्रकृती ढासळली –

लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, स्वामिनाथन आयोग, शेतमालास दीडपट हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती ढासळली आहे. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाला आहे. तसंच रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. उपोषण सुरुच राहिलं तर किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. याशिवाय त्यांचे 3.5 किलो वजन कमी झाले आहे. अण्णांच्या प्रकृतीची वेळोवेळी डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे. राळेगणसिद्धीत ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. सरकारी वैद्यकीय पथकानं अण्णांची तपासणी केली. अण्णांच्या यकृतातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढत आहे. बिलिरुबिन हे यकृतातील द्रव्य आहे. रक्तातील तांबड्या पेशी मृत झाल्यावर बिलिरुबिन तयार होते. उपोषण सुरूच ठेवले तर त्यांच्या किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो अशी माहिती डॉ. भारत साळवे यांनी दिली आहे.