|| सतीश कामत

एका वृत्तवाहिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांला शिवसैनिकांकडून झालेली मारहाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी ‘आमच्या माणसावर कोणी हात उचलला तर आम्ही घरात घुसून मारू,’ अशा शब्दात दिलेल्या थेट धमकीमुळे निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच रत्नागिरीत शिवसेना आणि खासदार नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुद्दय़ावरून गुद्दय़ावर आले आहेत.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मतदारांचा कौल अजमावणारा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम एका वृत्तवाहिनीने गेल्या सोमवारी रत्नागिरीत आयोजित केला. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मतदारसंघाचे विकासाची कामे, स्थानिक आमदार-खासदारांची कामगिरी, त्यांच्याकडून मतदारांच्या अपेक्षा इत्यादी मुद्यांची चर्चा कार्यक्रमामध्ये अपेक्षित होती. त्यानुसार उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच, अमित देसाई या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांने मोबाइलवरील व्हिडीओ क्लिप दाखवली. २०१४ पूर्वी राज्यातील कॉंग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले उदय सामंत त्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे समर्थन करत असल्याचे त्यामध्ये दाखवले होते. पण मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सामंत शिवसेनेमध्ये प्रवेश करून निवडून आले. त्यानंतर सेनेच्या धोरणानुसार त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध सुरू केला. त्यांचे हे वर्तन दुटप्पीपणाचे असल्याचा देसाई यांचा आरोप होता. कार्यक्रमामध्ये सहभागी शिवसेनेचे आमदार राजन साळवी, तालुका प्रमुख बंडय़ा साळवी, आमदार सामंतांचे बंधू किरण सामंत इत्यादींसह इतर शिवसैनिक या आरोपामुळे स्वाभाविकपणे खवळले आणि त्यांच्यापैकी काहीजणांनी कार्यक्रम चालू असतानाच देसाईंच्या दिशेने धाव घेत त्यांना बेदम मारहाण केली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण थांबवण्यात आले. तेथे उपस्थित काही मंडळींनी देसाईंची सुटका केली आणि आमदार सामंत यांचे कट्टर समर्थक बाबू म्हाप यांनीच देसाईंना गाडीत घालून सुखरूपपणे बाहेर काढले.

अशा प्रकारे प्रकरणावर पडदा पडला, असे वाटत असतानाच गेल्या मंगळवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी  सेनेचे शहर उपप्रमुख श्रीकृष्ण ऊर्फ बाबा चव्हाण यांच्या केशकर्तनालयात घुसून ग्राहकांना बाहेर काढले आणि चव्हाण यांना मारहाण केली. तसेच दुकानाचेही नुकसान केले. थोडय़ाच वेळात आमदार साळवी यांच्यासह सेनेचे स्थानिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने तेथे जमा झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन  गुन्हा दाखल केला आणि स्वाभिमान पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नित्यानंद दळवी, अमेय मसुरकर आणि देसाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दळवी वयाची साठी ओलांडलेले असून देसाई मार खाल्ल्यामुळे दडपणाखाली घरीच होते, असा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे आणि ती शक्यता जास्त आहे. याचा अर्थ खरे हल्लेखोर अजून सापडलेले नाहीत.

दरम्यान लागोपाठ दोन दिवस घडलेल्या या परस्परांवरील मारहाणीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर माजी खासदार नीलेश राणे यांनी बुधवारी संध्याकाळी रत्नागिरीत येऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या देसाईंची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, शिवसैनिकांनी देसाईंना केलेल्या मारहाणीचा त्यांनी निषेध केला. तसेच ‘आमच्या माणसावर हात टाकला तर आम्ही घरात घुसून मारायलाही मागे-पुढे बघणार नाही’, अशी थेट धमकीच दिली. यावर शिवसेना नेत्यांकडून प्रत्युत्तर अपेक्षित होतेच.

या दहशतीच्या वातावरणाचा आम्ही निषेध करतो, असे सांगून सेनेचे खासदार विनायक राऊत गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हणाले की, नीलेश राणेपुरस्कृत दहशत निर्माण करण्याचे प्रकार गेले दोन दिवस चालू आहेत. स्वाभिमान पक्षाच्या भाडोत्री गुंडांकडून शिवसैनिकांच्या दुकान-हॉटेलांवर धुडगूस घातला जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही असे नमूद केले.

वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजर असलेले सेनेचे आमदार राजन साळवी म्हणाले की, रत्नागिरी हा शांतताप्रिय जिल्हा आहे. येथील राजकीय संस्कृती बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. तसे करणाऱ्यांना जनतेने यापूर्वीच बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांला मारहाण करून सेनेच्या कार्यकर्त्यांनी  या मारामाऱ्यांची  सुरवात केली असली तरी त्यांना भडकण्यास कारणीभूत ठरलेली सुमारे सहा वर्षांपूर्वीची व्हिडीओ क्लिप संबंधित कार्यकर्त्यांकडे अचानक कशी आली, हे गुलदस्त्यातच आहे. स्वाभिमानच्या नेत्यांनी हे नियोजनपूर्वक केले असावे आणि सेनेचे मावळे त्या सापळ्यात अडकले, असे मानण्यास जागा आहे. या संदर्भात नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, गेले काही महिने नीलेश जाहीर सभांमधून सातत्याने आमदार सामंत यांना लक्ष्य करत आले आहेत. त्यामध्ये जुना राजकीय राग आहेच, शिवाय आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कोकणात शिवसेना हाच प्रमुख प्रतिस्पर्धी असल्यामुळे राणे पिता-पुत्र संधी मिळेल तेव्हा सेनेवर शरसंधान करत असतात. या घटनेच्या निमित्ताने त्या संघर्षांला कोकणात वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे.