रायगड किल्ल्याच्या संवर्धन कामाला आता सुरवात झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्वशास्त्राचे विद्यार्थी किल्ल्यावर काही ठिकाणी शास्त्रीय पध्दतीने उत्खनन करत आहेत. या उत्खननात मोठ्या प्रमाणात शिवकालिन वस्तू, शस्त्रास्त्र आणि नाणी आढळून आली आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातवरण आहे.

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्यसरकारने सहाशे कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. यात पहिल्या टप्प्यातील कामांसाठी साठ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत झाला आहे. पुरात्तत्व विभागाच्या परवानगीने किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या कामाला आता सुरवात झाली आहे. किल्ल्यावर दगडी मार्गीका आणि जगदिश्वर मंदीर परिसर आणि शिवाजी महाराज समाधीस्थळ परिसरावर रासायनिक प्रक्रीयेचे काम सुरु झाले आहे. पावसाळ्यापुर्वी हे काम पुर्ण होणे अपेक्षित आहे.

दुसरीकडे पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातत्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय पध्दतीने किल्ल्यावर काही ठिकाणी उत्खननास सुरवात केली आहे. भारतीय पुरात्तव विभागाच्या देखरेखील कॉलेजमधील १० जणांचा पथक गेल्या १५ दिवसांपासून उत्खनन करत आहे. संपूर्ण गडाची पहाणी केल्या नंतर काही मोजकीच ठिकाणं उत्खननासाठी निवडण्यात आली. यासाठी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा अवजारांचा वापर न करता केवळ कुदळ ,फावडी याच अवजारांचा वापर करण्यात आला आहे.

या उत्खननात मोठ्या प्रमाणात शिवकालीन अवशेष, शिवकालीन नाणी, त्याकाळात वापरल्या जाणाऱ्या बंदूकीतील गोळी, तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मटकी, चीनीमातीच्या भांडीची तुकडे, त्याकाळातील विटा, कौल त्याच बरोबर तोफगोळे हाती लागले आहेत. त्यामुळे शिवप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान .रायगड व परिसरातील एकवीस गावांच्या तपासणी करीता हैद्राबाद येथून विशेष मॅप तपासणी टिमला पाचारण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सध्या- अष्टप्रधान मंडळाच्या उजव्या बाजूला उत्खनन करत आहोत त्या मध्ये आम्हाला काही नाणी , तोफेच्या गोळया , बंदुकीच्या- गोळया , मृदभांडी सापडली आहेत . इथला अनुभव खूपच विलक्षण आहे.  जो इतिहास आजवर आम्ही  पुस्तके चाळून पहात होतो. तो प्रत्यक्ष स्वतच्या हाताने चाळून पाहताना खूपच आनंद होत आहे.’  – धनंजय खंडारे, विद्यार्थी डेक्कन कॉलेज पुणे

‘किल्ले रायगडच्या  संवर्धनाचे काम हाती घेत असताना ते  केवळ वरकरणी होवू नये यासाठी काही महत्वाच्या  ठिकाणी उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . कारण एकीकडे संवर्धन होत असताना दुसरीकडे रायगडच्या इतिहासाच्या  पाउलखुणा पुसल्या जाण्याची शक्यता होती . हा दडपलेला इतिहास त्या निमित्ताने बाहेर येईल आणि इतिहास नव्या पिढीला ज्ञात होईल ,ही भूमिका होती. त्यासाठी डेक्कन कॉलेजच्या मदतीने हे काम सुरू करण्यात आले आहे.  – खा. संभाजीराजे,अध्यक्ष किल्ले रायगड संवर्धन प्राधिकरण