निसर्ग चक्रीवादळामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी राज्यभरात किनारपट्टी भागात वास्तव्यास असणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं. त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. दरम्यान सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या सर्व लोकांची करोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, “वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणं दिसत नाहीत ना यासंदर्भातील चाचण्या केल्या जाणार आहेत. करोना असो किंवा वादळ आमचे अधिकारी हार पत्करणार नाहीत”.

याआधी आदित्य ठाकरे यांनी संकटाला घाबरून न जाता सर्वांनी एकमेकांचे अनुभव वाटून घेऊन काम करूया असं आवाहन केलं होतं. “मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफच्या सुसज्ज तीन तुकड्या सध्या मुंबईत आल्या आहेत. शिवाय पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आणि सक्षम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या पाठीशी ठाम आहेत. या संकटाला घाबरून न जाता सर्वांनी एकमेकांचे अनुभव वाटून घेऊन काम करूया,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवीतहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था करत लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक एस एन प्रधान यांनी दिली.