औरंगाबाद महानगरपालिकेत खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेदरम्यान गोंधळ घातला होता. तर काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर महापौरांनी एमआयएमच्या काही नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबन केले होते. याच प्रकरणावरून शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातील संपादकीयमधून एमआयएमवर निशाणा साधला आहे. लोकसभेत शिवसेनेच्या झालेल्या निसटत्या पराभवामुळे संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनला नाही. ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा असल्याचे सांगत शिवसेनेने एमआयएमवर हल्लाबोल केला.

आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील, असेही त्यात सामनाच्या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदनही करण्यात आले आहे. दरम्यान, एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच्या शहराच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला असून पुढे आता काय घडेल याची प्रचिती गुरूवारच्या प्रकारावरून दिसून येत असल्याची टीकाही त्यातून करण्यात आली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?
जेथे औरंग्यास गाडले किंवा पुरले त्या संभाजीनगरात हिरव्या विषाला पुन्हा उकळी फुटली आहे. महाराष्ट्रातच काय, संपूर्ण देशभरात हिंदुत्वाची लाट उसळली असताना लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचा निर्णय विचित्र लागला. गेली 30 वर्षे संभाजीनगरवर डौलाने फडकणारा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते. हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच संभाजीनगरच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला. यापुढे काय घडणार आहे त्याचे प्रात्यक्षिक संभाजीनगर महापालिकेत गुरुवारी झालेल्या राड्यावरून स्पष्ट झाले.

– कन्नडच्या खानांसारखे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ आमच्यातच निपजल्यावर धर्मांधांची विषवल्ली फोफावणारच. संभाजीनगरच्या महापालिकेत नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विजयी खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव येत असताना ओवेसी पक्षाचे मियाँ जलील यांचा स्वतंत्र अभिनंदन ठराव घ्यावा हा हट्ट कशासाठी?

– जलील यांनी आपण औरंगाबादचे नव्हे, तर संभाजीनगरचे खासदार आहोत हे मान्य करावे.

– महापालिकेत ‘ओवेसी’ पक्षाच्या नगरसेवकांनी ‘वंदे मातरम्’चे सूर आळवावेत.

– ट्रिपल तलाकबाबत मोदी सरकारने घेतलेल्या मानवतावादी भूमिकेस पाठिंबा द्यावा.

– कश्मीरातील 370 कलम हटवणे, देशभरात समान नागरी कायदा लागू करणे अशा राष्ट्रीय मुद्दय़ांवर पाठिंबा द्यावा. हे राष्ट्रीय मुद्दे असून त्यांस पाठिंबा देणाऱ्यांचाच अभिनंदन ठराव संभाजीनगर पालिकेत मंजूर होईल.

– लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या घरात घुसून अतिरेक्यांना मारले तेच आक्रमण आम्हालाही शक्य आहे.

संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे.