शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात दोन दिवस कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत असणार आहेत. पूरग्रस्त भागाची पाहणी करून महापुराचा फटका बसलेल्या नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी व शिवसैनिकांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, धैर्यशील माने या शिवसेना नेत्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून मदत केली होती. दरम्यान, पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत दिली होती. हा दौरा निश्चिच झाला असून पुढील आठवड्यात २१ आणि २२ ऑगस्टला उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंसह पूरग्रस्त भागाला भेट देणार आहे.

संततधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर महापुराची आपत्ती ओढवली होती. धरणातून करण्यात आलेला विसर्ग आणि पंचगंगा, कृष्णा नद्यांचे पाणी गावे, नागरी वस्त्यांमध्ये शिरल्याने लाखो लोकांना बेघर व्हावे लागले. मागील तीन चार दिवसांपासून या भागात पावसाने विश्रांती घेतल्याने पूराचे पाणी ओसरू लागले आहे. तसेच मदत कार्यालाही वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच पुनर्वसन करण्याचे आश्वासन पूरग्रस्तांना दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वातंत्र्य दिन पूरग्रस्त भागातच साजरा केला. तसेच पक्षातील इतर नेत्यांनीही पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या आहेत.