News Flash

या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं, पण…; राऊतांनी दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला

"सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल"

या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं, पण…; राऊतांनी दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. (संग्रहित छायाचित्र)

सचिन वाझे प्रकरणावर पडदा टाकण्याच्या प्रयत्नात महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी वाढल्याचं दिसत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवलं. या पत्रात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या पत्राची खातरजमा केली जात असली, तरी सरकारसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारमधील सर्व घटकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवं. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं. या सगळ्या प्रकरणात शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन,” असं राऊत यांनी सांगितले.

“परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त होते. ते एक उत्तम अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तम सेवा बजावली आहे. मात्र, परमबीर सिंह यांनी पत्रात लिहलेल्या गोष्टींची सत्यता पडताळावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही सत्यता पडताळून पाहतील. विरोधी पक्षाच्या मागणीवर सरकार चालत नाही किंवा सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. मी चहाला उधार नाही, पण या पत्राने सरकारवर शिंतोडे उडवले ही बाब मी मान्य करतो. हे सरकार स्थापन करण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या पण सरकारबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ही धक्कादायक गोष्ट आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 9:55 am

Web Title: shivsena leader sanjay raut reaction parambir singh letter bomb and advice to thackeray govt bmh 90
Next Stories
1 “बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?”, अमृता फडणवीसांचा सरकारवर निशाणा
2 हमको तो बस तलाश नए रास्तो की है,…; ‘लेटरबॉम्ब’नंतर संजय राऊतांचं ट्विट
3 “फडणवीस मोदी-शाह यांना भेटले, नंतर सिंग यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”
Just Now!
X