महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातला प्रयोग हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा प्रयोग आहे. या प्रयोगाकडे कायमच एक वेगळा बदल म्हणून पाहिलं जाईल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची मोट बांधण्यात ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली ते दोन महत्त्वाचे नेते म्हणजे संजय राऊत आणि शरद पवार. या दोघांनी घेतलेल्या पुढाकारानंतर काय घडलं ते महाराष्ट्राने पाहिलंच आहे. दरम्यान आज शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या बंगल्यावर जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर झालेली ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

भेटीनंतर नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचं योगदान मोलाचं आहे. त्यांचा कामाचा उरक आणि उत्साह थक्क करणारा आहे. संकट आणि असंख्य वादळांमध्ये त्यांचे नेतृत्त्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित” अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी भेटीनंतर ट्विट केलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा प्रयोग हा आगळावेगळा प्रयोगच म्हटला पाहिजे. भाजपा आणि शिवसेना यांचं सरकार येईल असं वाटत असताना आणि जनतेने या दोन्ही पक्षांना मतपेटीतून तसा कौलही दिलेला असतानाही महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. याला मुख्य कारण ठरलं ते अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं भाजपा आणि शिवसेनेचं भांडण. हा वाद महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्यानंतर हे दोन पक्ष वेगळे झाले. मग शरद पवार यांनी त्यांच्या खास शैलीचं बेरजेचं राजकारण जुळवून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणलं. त्यांना तेवढीच मोलाची साथ दिली ती संजय राऊत यांनी. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे संजय राऊत यांचं वाक्य मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुदा सगळ्यांना पाठ झालं होतं. हा शब्द त्यांनी खरा करुन दाखवला. दोन दिवसांपूर्वीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीवर टीका करत या सरकारने वर्षभरात काहीही केलं नाही म्हटलं होतं. त्यालाही संजय राऊत यांनी साजेसं उत्तर दिलं. आता आज शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं म्हटलं आहे.