अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरुन सध्या भाजपा नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत रश्मी ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावे जमीन व्यवहार झाल्याची कागदपत्रं शेअर केली होती. अमृता फडणवीस यांनीही रिट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.

निलम गोऱ्हे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. “रश्मी ठाकरे कधीही गाणे म्हणणे, चेहरा बदलणे, वेगवेगळी विधानं करणे यामध्ये पडल्या नाही,” असा टोला निलम गोऱ्हे यांनी यावेळी लगावला. राम कदम यांच्यावर टीका करताना निलम गोऱ्हे यांनी मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहे. हाच सर्वात मोठा विनोद आहे अशी टीका केली.

किरीट सोमय्यांनी केलेल्या जमीन व्यवहाराच्या गौप्यस्फोटानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या…

“किरीट सोमय्या जेवणातील लोणच्याप्रमाणे सातत्यानं विषय काढत आहेत. मला तर वाटतं त्यांनी आतापर्यंत जेवढे आरोप केले आहेच त्याचे एक पुस्तक होईल. रवींद्र वायकर किरीट सोमय्या पाणचट असल्याचं म्हटलं आहे. मला ते वाक्य फार आवडलं, बऱ्याच दिवसांनी चांगला शब्द ऐकला. ते खरंच आहे,” असं म्हणत निलम गोऱ्हे यांनी किरीट सोमय्यांच्या टीकेला उत्तर दिलं.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रात जमीन व्यवहाराची माहिती दिली आहे. किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत त्याबद्दल एका महिन्यात पुरावे सादर करावेत अन्यथा जाहीरपणे माफी मागावी,” असं आव्हान निलम गोऱ्हे यांनी दिलं आहे.

अमृता फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?
“एखाद्या नेत्याने आणि त्याच्या कुटुंबाने कशाला प्राधान्य द्यायला हवं? विश्वासार्हतेला की नफेखोरीला? सत्तेसाठी पैशाचा वापर करणाऱ्यांचा आपण निर्णय करायला हवा,” असं अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.