माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात जात महत्त्वाचा विषय कधीच राहिलेला नाही असं म्हटलं आहे. तसंच ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर खापर फोडलं जात आहे असं आपल्याला वाटत नसल्याचंही ते बोलले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“माझी जात ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जातं,” देवेंद्र फडणवीसांचा आरोप

संजय राऊत यांनी म्हटलं की, “मला असं वाटत नाही. महाराष्ट्रात दलित, मुस्लिम मुख्यमंत्री झालेले आहेत. महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री द्यायचं कार्य, धाडस बाळासाहेब ठाकरेंनी दाखवलं होतं. बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. एक ब्राह्मण जे चार वर्षांपेक्षा जास्त काळ राहिले आणि दुसरा मराठा मुख्यमंत्री. महाराष्ट्रात जात महत्त्वाचा विषय कधीच राहिलेला नाही”.

फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
“जेव्हा तुम्ही लोकांना समजावू शकत नाही तेव्हा त्यांना गोंधळात टाका असा एक सिद्धांत आहे. मग कसंही करुन हे मागच्या सरकारच्या माथी कसं मारायचं सुरु होतं. दुर्दैवाने हे बोलणं मला शोभत नाही पण आज स्पष्टपणे सांगतो. काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं तर चालतं. काहीजण असा प्रयत्न करतात. पण मराठा समाजाला आणि राज्यातील सर्वांना समाजाच्या हितासाठी मी काय केलं आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या परसवण्याचं काम करणारे यशस्वी होणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली
“शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आलं. नाही तर शिवसेना आणि अकाली दलशिवाय एनडीए अशी कल्पनाच कोणी करु शकत नव्हतं,” असं संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसमिरत कौर यांच्या राजीनाम्यावर बोलताना म्हटलं आहे.

“एनडीएत कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय तर सोडून द्या पण जर एनडीएमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय होत आहेत तर धोरणात्मक चर्चा झाली असती तर बरं झालं असत,” असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.

“आम्ही अद्यापही जुने संबंध विसरु शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्त्वाचा शेवटचा स्तंभ होतो. टीडीपीचं काही नक्की नसतं, ते येऊन जाऊन असतात. फक्त शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधील सर्वात जुने, जाणते आणि निष्ठावान होते. बाकी नितीश कुमार येऊन जाऊन असतात. त्यांचं उद्याचं काही सांगू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत,” असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केली.

“कृषी विधेयकांवर चर्चाच झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आणि व्यापाऱ्यांचा फायदा होईल असं सर्वांचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह शरद पवार यांच्याशी बोलणार आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.