‘2019 लोकसभा निवडणुकांमध्ये जर भाजपासोबत युती केली नाही तर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडेल’, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेने भाजपाशी युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट पडेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं. नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेत आठवले बोलत होते.

युतीबाबत पंतप्रधानांनी स्वतः शिवसेना पक्षप्रमुखांशी बोलावं, अशी शिवसेनेची अपेक्षा असल्याचा दावाही आठवले यांनी केला. शिवसेनेचे संजय राऊत, सुभाष देसाई यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी या मुद्यावर शिवसेनेशी बोलावे, अशी त्यांची अपेक्षा आहे, असं आठवले म्हणाले. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही बाब टाकली आहे. ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील असंही आठवले म्हणाले. तसंच शिवसेना दूर गेली तरी रिपाइं मात्र भाजपासोबतच राहील, हे देखील आठवले यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय, भाजपाने संविधानाला धक्का लावल्यास मी भाजपाची साथ सोडून देईन. असा प्रयत्न झालाच तर आपण सगळे एकत्र येऊ आणि भाजपाचा सत्यानाश करू, असा इशाराही सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.