News Flash

“ओठास लाली व तोंडास पावडर लावून बसलेल्यांनी खिडकीही बंद करावी”

भाजपाचे ओझे शिवसेनेनेच नाही तर महाराष्ट्राने उतरवले आहे असंही शिवसेनेने म्हटलं आहे

शिवसेनेने भाजपाचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे. भाजपाच्या रुपाने शिवसेनेवर असलेलंच नाही तर राज्यावर असलेलं ओझं उतरलं अशीही टीका शिवसेनेने केली आहे. डॉ. श्रीराम लागू यांचं मंगळवारी निधन झालं. त्यानंतर बुधवारी या बातमीचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना सिनेमाचा उल्लेख केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, “सामना सिनेमात एक गाणं आहे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. आम्हीही ३० वर्षे ओझं उचलत होतो ते आता उतरवलं आहे.” उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत सामनातून भाजपावर, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेसाठी दरवाजे अजूनही खुले असल्याचं वक्तव्य केलं होतं. ज्यावर ओठास लाली आणि तोंडाला पावडर लावून खिडकीत बसणाऱ्यांनी ती खिडकीही बंद करावी अशी बोचरी टीका सामनातून करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

भाजपा म्हणजे ‘भारत जलाओ पार्टी’ आहे अशी बोंब ज्यांनी ठोकली होती ते रामविलास पासवान मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मोदी यांना खालच्या शब्दात टोले मारणारे नितीशकुमार हे बिहारात भाजपच्या टेकूवर मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कोणी कोणावर बोलायचे? भारतीय जनता पक्षाचेच नेते देशाच्या प्रश्नांवर, जनतेच्या मागण्यांवर मूग गिळून बसले आहेत. पण भावनिक विषयांवर तोंड फाटेपर्यंत बोलत आहेत. काँग्रेस पक्षातून टनावारी माणसं फोडून आपल्या पक्षात घ्यायची आणि सत्ता मिळवायची हे ज्यांना चालते त्यांनी शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले वगैरे अशी वक्तव्यं करण्याच्या भानगडीत पडू नये. देवेंद्र फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार झाले आहे. त्यांचे मन मोकळे व्हायला वेळ लागेल.

भाजपाचे ओझे फक्त शिवसेनेनेच उतरवले नाही तर भाजपाची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझेही उतरले व हवा मोकळी झाल्याचे वातावरण निर्माण झाले. ओझे व ताण इतका उतरला की, एकनाथ खडसे यांच्यासारखे नेते आता खुलेपणाने बोलू लागले आहेत. खडसे यांना आता इतके मोकळे वाटू लागले आहे की, ते एकाच वेळी पवारांना भेटतात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतात. माझा निर्णय घ्यायला मी मोकळा असल्याचे ते हिमतीने सांगतात. पंकजा मुंडे यांचीही भूमिका वेगळी नाही. प्रत्येकजण मनावरील ओझे फेकून देत आहे व मोकळा श्वास घेत आहे.

महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेस दगा दिला व हे दगानाट्य ठरल्याप्रमाणेच झाले. २०१४ मध्ये एकनाथ खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा मोठय़ा गर्वात केली. आज खडसे इतरांच्या पायऱ्या झिजवत आहेत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी.

भाजपाचे ओझे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपूरच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने खिडकीत बसून ‘शुक शुक’ करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजविणे बंद केले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 7:21 am

Web Title: shivsena slams bjp and devendra fadanvis in saamana editorial scj 81
Next Stories
1 ट्रक उलटल्याने ३ कामगार ठार, ४ जण जखमी
2 राज्यातील विद्यार्थी संख्येत १.५३ लाखांनी घट
3 महापुराचा दूध उत्पादनालाही फटका
Just Now!
X