बिहारमधील विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून १२५ जागांवर विजय मिळाला आहे. बिहार निवडणुकीत भाजपा मोठा भाऊ ठरला आहे. दरम्यान नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा असा सल्ला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टीव्ही ९ शी बोलताना दिला आहे. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये सरकार स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा सल्ला घ्यावा असंही ते म्हणाले आहेत.

उदय सामंत यांनी यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. त्यांनी दिलेली झुंज कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, “बिहारमध्ये सरकार स्थापन करताना नितीश कुमार यांनी शरद पवार यांचा सल्ला घेतला आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखं खंबीर नेतृत्व केलं तर राज्यातील महाविकास आघाडीसारखा पॅटर्न बिहारमध्येही निर्माण होऊ शकतो”.

बिहार निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा प्रादेशिक पक्षांना कशा पद्धतीने संपवत आहे हे देशाला पुन्हा एकदा कळल असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं. एखाद्या प्रादेशिक पक्षाला कसं संपवलं जातं याचं महाराष्ट्रानंतरचं दुसरं उदाहरण बिहार असल्याची टिका उदय सामंत यांनी केली.

याआधी देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा बिहारचा महाराष्ट्र होईल का? असं विचारण्यात आलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की, “दोन्ही वेगळी राज्यं आहेत. बिहारमध्ये बिहारचाच पॅटर्न चालणार. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार होईल. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. भाजपा त्याला पूर्ण समर्थन देईल”.