News Flash

धक्कादायक : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रुग्णाचा मृतदेह गहाळ!

तीन दिवसांपासून नातेवाईकांची शोधाशोध; अखेर पोलिसांत तक्रार

संग्रहीत

यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एका तरूण रूग्णाचा मृतदेह गहाळ झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. मंगळवारी रात्री या तरूण रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूनंतर नातेवाईकांनी खातरजमा केल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदन गृहात नेऊन ठेवणे अपेक्षित असताना, तो नेमका कुठे बेपत्ता झाला? याचा शोध अद्यापही लागला नाही. या घटनेमुळे वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ उडाली. या घटने प्रकरणी चार सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी केली आहे.

नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रोशन भीमराव ढोकणे (२७) या तरूणास पोटदुखीच्या असह्य त्रासामुळे मंगळवारी सकाळी ९.३० वाजता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. प्रारंभी त्याला फिवर ओपीडीमध्ये दाखल केले गेले. सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास तेथून वॉर्ड क्र. २५ मध्ये हलविण्यात आले. त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास या तरूणाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. नातेवाईकांनी मृतदेहाची खातरजमा केली व ते गावी निघून गेले. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात मिळेल, असे सांगण्यात आल्याने बुधवारी नातेवाईक रूग्णालयात पोहचल्यानंतर रोशनचा मृतदेह कुठेच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. वैद्यकीय महाविद्यालय, शवविच्छेदन गृह सर्वत्र शोध घेऊनही त्याच्या मृतदेहाचा ठावठिकाणा लागला नाही. शवविच्छेदन गृहात दररोज ३० ते ४० मृतदेह येत आहेत. यातील बहुतांश रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला असतो. रोशनाचा मृतदेह शोधण्यासाठी त्याच्या भावाने बुधवारी व गुरूवारी बहुतांश सर्व मृतदेहांचे चेहरे पाहून शोध घेतला, मात्र रोशनचा मृतदेह आढळला नाही. या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यायलाने प्रथम टोलवाटोलवी केली. मात्र हा प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास येताच, सारवासारव सुरू केली.

तीन दिवसांपासून रोशनचे नातेवाईक त्याचा मृतदेह शोधत असून, तो अद्यापही सापडला नाही. याप्रकरणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनाही वॉर्ड प्रभारीकडून चुकीची माहिती देण्यात आल्याचे समोर आले. सदर युवकाचा मृतदेह वॉर्डात होता व तो शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला, अशी माहिती दिल्याने रूग्णाच्या नातेवाईकांनी दोन दिवस प्रतीक्षा केली. अखेर गुरूवारी मृताचा भाऊ सुनील ढोकणे याने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करून दोषींवर कारवाईची मागणी केली.

मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले असण्याची शक्यता –
वैद्यकीय महाविद्यालयात दररोज सरासरी ३० ते ४० रुग्णांचा मृत्यू होत आहे. करोनाबाधितांचा मृतदेह नेताना रोशनचा मृतदेह चुकीने नेण्यात येऊन त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले असण्याची शक्यता आहे. येथील शवविच्छेदनगृहात एका मध्यमवयीन अनोळखी पुरूषाचा मृतदेह दोन दिवसांपासून ठेवलेला आहे. त्याची ओळख अद्यापही पटली नाही. त्यामुळे कुणीतरी चुकून रोशनचा मृतदेह घेऊन गेले आणि हा मृतदेह तसाच राहिला असण्याची शक्यता आहे. या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 6:26 pm

Web Title: shocking patients body missing from government medical college msr 87
Next Stories
1 “रेमडेसिविर, लस पुरवठा वाढवा”, पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांची मागणी
2 हवाई मार्गाने ऑक्सिजनची वाहतूक करण्याबाबत केंद्रानं महाराष्ट्राला दिली परवानगी, पण….
3 विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याच्या वक्तव्याबाबत टोपेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
Just Now!
X