छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याने आज पालिकेच्या सभेला उपस्थिती लावली. यावेळी छिंदमच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. छिंदम पालिकेत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड यांच्यासह अनेक शिवप्रेमी पालिका परिसरात जमा झाले होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजीदेखील केली. यामुळेच पोलिसांनी छिंदमसाठी कडक सुरक्षा ठेवली होती. दरम्यान पालिकेच्या सभेसाठी आलेला छिंदम निवेदन देऊन लगेच परत निघून गेला.

माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या निंदनीय वक्तव्याच्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया राज्यभरात उमटल्या होत्या. यानंतर भारतीय जनता पक्षाने छिंदम याच्या उपमहापौरपदाचा राजीनामा घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन करत तोडफोडही करण्यात आली होती. छिंदम याचे निवासस्थान, महापालिकेतील त्यांचे दालन, शहरातील त्यांच्या हॉटेलवर दगडफेक करत, तोडफोड करत संताप व्यक्त करण्यात आला होता.

काय घडले होते?

* छिंदम याने प्रभागातील कामासाठी मनपाचे बांधकाम कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी बोलताना शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

* बिडवे यांनी यासंदर्भात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांच्याकडे तक्रार केली होती. छिंदम यांच्या वक्तव्याची ‘ऑडिओ क्लीप’ समाज माध्यमावर व्हायरल झाली होती.

* शिवसेना, राष्ट्रवादी यांनी मोर्चे काढत छिंदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गांधी यांनी छिंदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले होते.