21 April 2019

News Flash

उत्तर प्रदेशातील सहा शहरे सर्वाधिक प्रदूषित

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या दिवशी फोडण्यात आलेल्या फटाक्यानंतर वायू गुणवत्ता निर्देशांक त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केला.

(संग्रहित छायाचित्र)

दिवाळीतील प्रदूषण – दिल्लीचा क्रमांक आठवा – चंद्रपुरात पातळी कमी

सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून राजधानी दिल्ली गाजत असतानाच दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणात ६७ शहरांमध्ये राजधानी दिल्लीचा क्रमांक आठवा आहे. तर उत्तर प्रदेशातील सहा शहरे सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत आहेत. त्याचवेळी तिरुपती या तीर्थस्थळी सर्वाधिक कमी प्रदूषणाची नोंद करण्यात आली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या दिवशी फोडण्यात आलेल्या फटाक्यानंतर वायू गुणवत्ता निर्देशांक त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केला. यात ६७ शहरांची माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजधानी दिल्लीत प्रदूषणाची मात्रा भारतातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक राहील असे वाटत होते.

मात्र, सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत हा क्रमांक तब्बल आठवर आला. महाराष्ट्रातील भिवंडी येथे वायू गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक ३०६ इतका तर सर्वात कमी चंद्रपूर येथे ११२ नोंदवण्यात आला. महाराष्ट्रात चंद्रपूर हे शहर सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत असताना दिल्लीप्रमाणेच या शहरात देखील दिवाळीच्या दिवशी प्रदूषणाची पातळी कमी नोंदवण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील देशभरात बुधवारी मोठय़ा प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. दिवाळी तसेच अन्य सणांदरम्यान रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश देत पोलीस खात्याला कारवाईचा अधिकार दिला.

मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतरही देशभरात रात्री दहानंतर  फटाके फोडण्यात आले. उत्तर प्रदेशातील शहरांचा वायू गुणवत्ता निर्देशांका हा इतर राज्यातील शहरांच्या तुलनेत अधिक आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तब्बल ३२ प्रदूषण मापक स्थानकांवरची माहिती घेण्यात आली. तरीही वायू गुणवत्ता निर्देशांकात हे शहर आठव्या क्रमांकावर आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार रात्री आठनंतर अतिसूक्ष्म धूलिकण २.५ आणि १० मध्ये प्रचंड वाढ झाली. वायू गुणवत्ता निर्देशांक हा एकाच दिवसाचा असला तरी पुढील दोन दिवसात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

First Published on November 8, 2018 11:44 pm

Web Title: six cities in uttar pradesh are most polluted