जिल्ह्य़ातील सहा डॉक्टर बेपत्ता

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणारी ३१ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे सध्या रिक्त आहेत. तर सहा डॉक्टर वर्षभरापासून नियुक्तीच्या ठिकाणापासून बेपत्ता आहेत.  त्यामुळे जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी आजारी पडली आहे.

रायगड जिल्ह्य़ात ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १५ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालये, तर ७ जिल्हा परिषद दवाखाने कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जातो. मात्र सध्या आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे याला कारणीभूत ठरली आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात १३१ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यातील ३१ पदे रिक्त आहेत. तर सहा वैद्यकीय अधिकारी कुठलेही कारण न देता गैरहजर आहेत. जवळपास वर्षभरापासून त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. पनवेल, कर्जत आणि उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता जवळपास सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो आहे. हे कार्यरत अधिकारी सुट्टीवर गेले तर आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा बाधित होते आहे. तर काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकाच वेळी दोन आरोग्य केंद्रांचा कार्यभार सहन करावा लागतो आहे.

जिल्ह्य़ातील ५ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची पदे सध्या रिक्त आहेत. तर कोकबन, नागोठणे, इंदापूर, जीते, चौक, धोकवडे, आणि रेवदंडा येथील वैद्यकीय अधिकारी कामावरून सातत्याने गैरहजर आहेत. तांत्रिकदृष्टय़ा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरलेली असली तरी, डॉक्टरांच्या गैरहजर राहण्यामुळे त्यांच्या आरोग्य सुविधा मात्र स्थानिकांना उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे अशा बेपत्ता डॉक्टरांची सेवा खंडित करून त्यांच्या जागेवर नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात आहे.

‘डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. रिक्त पदे भरण्यासाठी दोन वेळा जाहिरात देण्यात आली होती. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.’

–  डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी.