लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ७५ झाली. दरम्यान, चार रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ३९ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यामध्ये ३३ अहवाल नकारात्मक, तर सहा अहवाल सकारात्मक आले आहेत. करोनाबाधित रुग्णांमध्ये एक महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यात मलकापूर येथील २५ वर्षीय तरुण, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील ६२ वर्षीय महिला, ४४ वर्षीय पुरुष, २६ व १८ वर्षीय तरुण आणि खामगाव येथील ३६ वर्षीय व्यक्ती आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. ४७ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात २५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी ८१ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एकूण १३१८ अहवाल नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर.जी. पुरी यांनी दिली.

दरम्यान, आज करोनातून बरे झालेल्या चार जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यामध्ये खामगाव व बुलढाणा येथील कोविड केअर सेंटरमधून प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. खामगाव येथून सुट्टी झालेले रूग्ण नांदुरा तालुक्यातील चांदुर बिस्वा येथील १२ व १६ वर्षीय मुली आहेत. तसेच बुलढाणा येथून चिखली येथील महिला व देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड येथील पुरुषाला सुट्टी देण्यात आली.