रेडिओ कॉलर लावलेल्या वाघांची शिकार का?, वन विभागासमोर प्रश्न

विदर्भात वर्षभरात ‘रेडिओ कॉलर’ लावलेल्या आणि न लावलेल्या एकूण ६ वाघांची वीज प्रवाहाने शिकार झाली. कॉलर लावलेल्या वाघांची शिकार का केल्या गेली? असा प्रश्न वन खात्याला पडला आहे. एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वनक्षेत्रात गेलेल्या कॉलर लावलेल्या वाघांचीही शिकार झाल्याने व्याघ्र स्थलांतर करण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यामुळे  रेडिओ कॉलर लावलेले वाघही सुरक्षित राहिलेले नाहीत, ही बाब प्रकर्षांने समोर आली आहे.

गडचिरोली जिल्हय़ातील चामोर्शी वनपरिक्षेत्रात ३ नोव्हेंबरला रोजी रेडिओ कॉलर लावलेल्या वाघिणीची शेताच्या कुंपणाला जिवंत वीज तार सोडून शिकार करण्यात आली. गेल्या वर्षभरात वीज प्रवाहाने सहा वाघांची शिकार झाली आहे. ६ नोव्हेंबर २०१६ रोजी धानपूर येथे अशाच पध्दतीने शिकार झाली होती. त्यानंतर ३ डिसेंबर २०१६ रोजी तेलंगणातील आदिलाबाद जिल्हय़ात, १२ जानेवारी २०१७ रोजी नागपूर जिल्हय़ातील सालेघाट, १७ एप्रिल २०१७ रोजी चंद्रपूर जिल्हय़ातील ब्रम्हपुरी तर वर्धा जिल्हय़ातील बोर येथे १४ ऑक्टोबरला अशाच पध्दतीने वाघाची शिकार झाली. ३ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हय़ातील मारोडा येथे वाघिणीला ठार करण्यात आले. जय, श्रीनिवासन तसेच इतर अन्य वाघांचीसुध्दा अशाच पध्दतीने शिकार झाली आहे. विशेष म्हणजे यातील जय, श्रीनिवासन, बोर, मारोडा या सर्व वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात आली होती. त्यांच्या हालचालींवर वन विभागाचे पूर्ण लक्ष होते. अशाही स्थितीत ६ वाघांची अशा पध्दतीने ठरवून शिकार केल्या गेली.

चपराळा अभयारण्यात सोडण्यात आलेल्या वाघिणीवर तर मागील दोन महिन्यांपासून वन विभागाचे लक्ष होते. हत्तीपासून तर दोन स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून तिच्यावर पाळत होती. अशाही स्थितीत वन पथकाचे थोडे दुर्लक्ष होताच संधी साधून ठार करण्यात आले. बोर अभयारण्यातील घटना सुध्दा अशाच प्रकारची आहे. त्यामुळे माणसांवर हल्ला करणारे वाघ आपल्या क्षेत्रात नकोच, या उद्देशानेच या वाघांची हत्या करण्यात आल्याचे प्रकर्षांने समोर येत आहे. विशेष म्हणजे यातील दोन वाघांना वन विभागाने स्थलांतरित केले होते. देसाईगंज येथे जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला त्याच जिल्हय़ातील चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले तर ब्रम्हपुरी येथे जेरबंद केलेल्या वाघाला वर्धा जिल्हय़ात सोडण्यात आले. अन्य भागात किंवा जिल्हय़ात धुमाकूळ घालणारा आणि माणसांचे बळी घेणारा वाघ आपल्या भागात नकोच याच उद्देशाने या दोन्ही वाघांची हत्या झाल्याचे दिसून येत आहे. अशा पध्दतीने जर वाघांची शिकार होत राहिली तर भविष्यात कुणीही वाघांना त्यांच्या परिसरात जागा देणार नाही, असेच एकूण या घटनांवरून दिसून येत आहे.

या सर्व घटना बघता वाघाच्या स्थलांतरणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वनक्षेत्रात आणि एका जिल्हय़ातून दुसऱ्या जिल्हय़ात वाघांना स्थलांतरित केले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे बोर व चपराळा येथील घटनेवरून दिसून आले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ.बिलाल हबीब यांनी वाघांना रेडिओ कॉलर लावल्यानंतरही त्यांची शिकार होण्यापासून आपण वाचवू शकत नाही, याबद्दल चिंता व्यक्त केली होती. व्याघ्र अभ्यासकही याविषयी सहमत आहेत. त्यामुळे आता वाघांची जिवंत विद्युत तारांनी शिकार होणार नाही, यासाठी ग्रामस्थांमध्येच खऱ्या अर्थाने जनजागृती करण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा व्याघ्र प्रकल्प व बफर क्षेत्रातील वाघ अशाच पध्दतीने मृत्यूमुखी पडत जाणार हे कटू सत्य आहे.

देशात १० महिन्यांत ७६ वाघांचा मृत्यू

३ जानेवारी ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत देशात एकूण ७६ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २२ वाघिण आणि इतर सर्व वाघ आहेत. त्यामुळे एकूणच वाघांच्या संरक्षण व संवर्धनाचा प्रश्न समोर आला आहे. यामध्ये सर्वाधिक वाघांचे मृत्यू मध्य प्रदेशात १८ झाले आहेत. त्या पाठोपाठ कर्नाटक १५, महाराष्ट्र १४, उत्तराखंड १२, उत्तरप्रदेश ५, आसाम ४, ओडिशा २, केरळ २, तामिळनाडू, राजस्थान व तेलंगणामध्ये एका वाघाचा मृत्यू झाला आहे.