लगतच्या तेलंगणा व आंध्रप्रदेशातून चंद्रपुरात कासवाची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असून ‘पैशाचा पाऊस’ पाडणाऱ्या २१ नखांच्या कासवासह आठ जणांना लक्कडकोट वनोपज नाक्यावर वन पथकाने अटक केली आहे. तंत्रमंत्राची क्रिया करून इच्छा व्यक्त केल्यानंतर हा कासव पाऊस पाडतो, अशी अंधश्रद्धा आहे. याच अंधश्रद्धेपोटी कासवाची तस्करी मोठय़ा प्रमाणात होत आहे.
महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर चंद्रपूर हा जिल्हा वसलेला आहे. त्यामुळे या जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात अवैध दारू, सागवान, वाघ, बिबटय़ांचे चामडे, अवयव तसेच इतर अन्य वस्तूंची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत आहे. आता तर कासवांच्या तस्करीचे प्रकार समोर आले आहे. सहा महिन्यापूर्वी तेलंगणातून चंद्रपुरात आणलेले शेकडो कासव पकडण्यात वन विभागाला यश आले होते.
वन विभागाने ‘पैशाचा पाऊस’ पाडणाऱ्या कावसाची तस्करी करताना आठ जणांना मुद्देमालासह अटक केली आहे. हैदराबादकडून येणाऱ्या इनोव्हा गाडीतून या कासवाची तस्करी केली जात होती.
लक्कडकोट येथील वनोपज नाक्यावर अधिकाऱ्यांनी ही गाडी थांबवून झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शेख आजम पाशा, साजिद अली शेख (रा. हैदराबाद), एन. ज्ञानेश्वर वेणुगोपाल, (रा. नलगोंडा), मो. बाबा अहमद, मौ. फैजल अर्शद, अब्दुल रहेमान मो. हाजी, मे. क्रिष्णा वायल्ला कावली, लक्ष्मण हनमंतू या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एका कापडाच्या पिशवीतून चंद्रपुरात हा कासव पोहोचविला जात होता.
सुमारे पाच किलो वजनाच्या या कासवाला २१ नखे आहेत. खास तंत्रविद्य्ोसाठी या कासवाचा उपयोग केला जातो. अतिशय दुर्मीळ असलेल्या या कासवांवर तंत्रविद्या करून पैशाचा पाऊस पाडता येतो अशी अंधश्रद्धा आहे. तसेच गुप्तधनाच्या शोधासाठी सुद्धा या कासवाची मागणी आहे. या प्रकरणी मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, उपविभागीय वन अधिकारी ए.डब्ल्यू. कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक मेडपल्लीवार, वनरक्षक भारत मडावी, एस.व्ही. मेश्राम, वनमजूर दुर्गे यांनी ही कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, लक्कडकोट या मार्गाने मोठय़ा प्रमाणात तस्करी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेश व तेलंगानात कासवाची तस्करी करणारी खास टोळी सक्रिय आहे. या टोळीच्या माध्यमातूनच चंद्रपूर जिल्हय़ात कासव पाठविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ चंद्रपूरच नाही तर लगतच्या गडचिरोली व महाराष्ट्रातील अन्य जिल्हय़ात सुद्धा आंध्र व तेलंगणा या दोन राज्यातून कासव पाठविले जात आहे.
कासवाचे महत्त्व पूजेमध्ये आहे. तसेच काही लोक कासवाचे मटन सुद्धा खातात. या दोन्हींसाठी कावसाला पाहिजे ती किंमत मोजली जाते. त्यामुळेच या दोन राज्यातून मोठय़ा प्रमाणात तस्करी सुरू असल्याची माहिती या माध्यमातून समोर आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2015 रोजी प्रकाशित
चंद्रपुरात २१ नखांच्या कासवाची तस्करी
लगतच्या तेलंगणा व आंध्रप्रदेशातून चंद्रपुरात कासवाची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असून ‘पैशाचा पाऊस’ पाडणाऱ्या २१ नखांच्या कासवासह आठ जणांना लक्कडकोट वनोपज नाक्यावर वन पथकाने अटक केली
First published on: 18-06-2015 at 07:36 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smuggling of tortoise in chandrapur