सोलापुरात करोनाबाधित रूग्णांची संख्या वरचेवर वाढत चालल्यामुळे हा सोलापूरकरांसाठी सार्वत्रिक चिंतेचा विषय ठरला असता तरी दुसरीकडे करोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ही बाब तेवढीच आश्वासक मानली जात आहे.
काल शुक्रवारी एका रात्रीत करोनाबाधित १७ नव्या रूग्णांची भर पडली होती. तर सायंकाळी सहापर्यंत आणखी चार रूग्ण वाढले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ३६४ वर पोहोचली असून यात २४ मृतांचा समावेश आहे. रूग्णालयातून करोनामुक्त झालेल्या १५० रूग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.

सोलापुरात करोनाचा पहिला रूग्ण १२ एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर हळूहळू रूग्णसंख्या वाढत चालली असून सध्या सरासरी दहाप्रमाणे रूग्ण आढळून येत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयासह राज्य विमा कामगार रूग्णालय व डॉ. द्वारकानाथ कोटणीस रेल्वे रूग्णालयात करोनाबाधित रूग्णांवर उपचार होत आहेत.

आतापर्यंत करोना संशयित अशा ४१२० रूग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असता त्यात ३६४ रूग्ण करोनाबाधित असल्याचे दिसून आले. यात १९७ पुरूष तर १६७ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी करोनावर मात केलेल्या ३७ रूग्णांना घरी पाठविण्यात आले असून आतापर्यंत ९४ पुरूष व ६६ महिलांसह १५० रूग्णांना करोनामुक्त झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या ९० पुरूष व १०० महिलांसह १९० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात करोना चाचणी केंद्रात दररोज ९० चाचण्यांची क्षमता असताना प्रत्यक्षात शंभरपेक्षा अधिक चाचण्या घेतल्या जातात. शनिवारी २३४ चाचणी अहवाल हाती आले. अद्यापि २८६ अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे त्या प्रमाणात रूग्णसंख्याही वाढत आहे. यातूनच रूग्णांची साखळी तुटण्याबद्दल विश्वास व्यक्त केला जात आहे.