सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश विष्णुपंत कोठे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत कोठे हे राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत. कोणतीही अट न ठेवता आपण राष्ट्रवादीत प्रवेश करीत असलो तरी आमदारकीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होईल, असा आशावादही कोठे यांनी बाळगला आहे.

महेश कोठे यांनी यापूर्वी २००९ साली सोलापूर शहर उत्तरमधून काँग्रेसच्या तिकिटिवर पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१४ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी झुंज देताना कोठे हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. त्यांच्या गळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची माळही घालण्यात आली होती. मात्र दोनवेळा पराभव होऊनही पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनी मागील २०१९ साली शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी हाती घेतली असता शिवसेनेने शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे सेना बंडखोर म्हणून आपले भवितव्य अजमावून पाहिले. परंतु तिसऱ्यांदा पदरी निराशाच आली. एव्हाना, २०१७ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीत कोठे यांनी सेनेच्या नगरसेवकांची संख्या ८ वरून थेट २१ वर वाढवून शहरात स्वतःसह सेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणुकीत केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेतून हकालपट्टी झाली तरी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडेच शाबूत राहिले होते.

Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

या पार्श्वभूमीवर अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या बांधणीची जोरदार तयारी करीत यापूर्वी पक्षातून इतर पक्षात गेलेल्या मंडळींसह इतरांना पक्षाचा दरवाजा मोकळा ठेवला आहे. यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील स्वतःची ताकद पुन्हा वाढविण्यावर भर दिला जात आहे. सोलापूरही आतापर्यंत राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. परंतु या जिल्ह्यावर भाजपने मोठी पकड बसविली आहे. सोलापूर शहरात आतापर्यंत तुलनेत राष्ट्रवादीची ताकद नगण्य होती. परंतु आता शहरातही पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी सर्व जुन्या-नव्या मंडळींना एकत्र आणले जात आहे. पक्षापासून गेले दहा वर्षे दूर राहिलेले माजी शहराध्यक्ष शंकर पाटील यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत सन्मानाने पाचारण करून त्यांच्यावर प्रदेश संघटन सचिवपदाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाला लाभदायक असणारी प्रत्येक बाब गांभीर्याने विचारात घेत असताना आता शिवसेनेचे महेश कोठे यांनाही पक्षात सामावून घेण्याचे राष्ट्रवादीने ठरविले आहे.

कोठे हे राष्ट्रवादीत जात असल्यामुळे शिवसेनेत सावध प्रतिक्रिया उमटत आहे. महाविकास आघाडीची सत्ता टिकविताना शिवसेना व दोन्ही काँग्रेसमध्ये कोणीही एकमेकांचा पक्षाला खिंडार पाडायचा नाही, असे अलिखित ठरले आहे. तरीही शिवसेनेचे महेश कोठे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात असताना राष्ट्रवादीने सोलापुरात शिवसेनेत लगेचच खिंडार पाडायचे नाही, असे ठरविल्याचे संकेत मिळत आहेत. कारण महेश कोठे हे तूर्त एकटेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत त्यांच्या घरातीलच चार नगरसेवक आहेत. याशिवाय अन्य निकटचे नातेवाईक असलेले तीन नगरसेवक आहेत. तसेच त्यांच्यावर निष्ठा वाहिलेले अन्य सात नगरसेवक आहेत. मनात आणले तर हे सर्व १४ नगरसेवक शिवसेनेतून फुटून राष्ट्रवादीत जाऊ शकतात. परंतु कोठे यांचे कट्टर समर्थक असलेले सर्व नगरसेवकांना तूर्त शिवसेनेत राहण्याच्या या राजकीय खेळीमागे महेश कोठे यांचा आणखी काही डाव असू शकतो, असे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते.