News Flash

प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे सांगलीत रुग्णांचा जीव टांगणीला

प्राणवायूअभावी रुग्ण दाखल करून घेण्यास असमर्थता

प्राणवायू सिलेंडरमध्ये भरण्यासाठी आमदार पुत्र रोहित पाटील औद्योगिक वसाहतीमधील भरणा केंद्रावर रात्रभर  ठाण मांडून होते.

प्राणवायूअभावी रुग्ण दाखल करून घेण्यास असमर्थता

सांगली : प्राणवायूच्या अपुऱ्या  व अनियमित पुरवठय़ामुळे करोना बाधित रुग्णांच्या श्वासासाठी अनेकांचा जीव शनिवारी रात्रभर  टांगणीला  लागला होता. रुग्णालयात खाटा रिक्त असूनही प्राणवायूचा अनियमित पुरवठा होत असल्याने काही रुग्णालयांनी रुग्ण दाखल करून घेण्यास रविवारी असमर्थता दर्शवली.

शनिवारी अनेक रुग्णालयांनी प्राणवायूसाठी कुपवाडमधील भारत गॅस पुरवठादार यांच्याकडे मागणी नोंदवली होती. या केंद्रावर सायंकाळी साडेआठ वाजता द्रवरूप प्राणवायूचा पुरवठा करणारा टँकर येणे अपेक्षित असताना रात्री साडेबारा वाजता टँकर आला. तोपर्यंत प्राणवायूसाठी नंबर लावलेल्या टाक्यांची रांग लागली होती. सध्याही मागणी नोंदविल्यानंतर आठ ते दहा तास प्राणवायूसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना प्राणवायूचा अखंडित पुरवठा करण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापक, डॉक्टर आणि नातेवाइकांची रात्रभर धावपळ सुरू होती. प्राणवायू अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याने काही रुग्णालयांनी अत्यवस्थ रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.  तसेच जर अन्य  रुग्णालयात पुरेसा प्राणवायू उपलब्ध असेल तर आपल्या रुग्णाला हलविण्यात यावे अशी विनंती करणारा फलक कुल्लोळी इस्पितळाबाहेर लावण्यात आला आहे.  भगवान महावीर कोव्हिड हॉस्पिटलचे संचालक सुरेश पाटील यांनी सांगितले,की रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांसाठी १५ खाटा असताना केवळ ९ खाटावरील रुग्णांसाठीच प्राणवायू मिळत असल्याने सहा खाटा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. तर विश्रामबागमधील कुल्लोळी हॉस्पिटलमध्ये रविवारी दुपारी प्राणवायू उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना दाखल करून घेण्यास असमर्थ असल्याचा फलक लावला. प्राणवायूचे टँकर वेळेत उपलब्ध होत नसल्याने सिलेंडर भरून देण्यासाठी विलंब होत असल्याचे भारत गॅस पुरवठादार नितीन प्रभू यांनी सांगितले.

जिल्हयात सध्या उपचाराखालील बाधितांची संख्या १३ हजार  ४०० वर पोहचली असून यापैकी २ हजार  ९७० रुग्ण विविध रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. यापैकी २ हजार  ३०२ रुग्ण शनिवारअखेर अत्यवस्थ असल्याची माहिती जिल्हा करोना नियंत्रण कक्षाकडून मिळाली. जिल्हयातील विविध ठिकाणी ६९ रूग्णालयात उपचार सुविधा असून गृहविलगीकरणात उपचार घेत असलेल्या १० हजार  ४३० रूग्णांपैकी कोणाला जर प्राणवायूची निकड निर्माण झाली तर उपचारासाठी खाट उपलब्ध करणे आव्हानात्मक ठरत आहे.  दिवसेंदिवस जिल्हयातील प्राणवायूची स्थिती गंभीर बनत असून याप्रकरणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी तातडीने लक्ष घालावे अशी विनंती करोना रूग्ण सहाय समितीचे सतीश साखळकर यांनी केली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:04 am

Web Title: some hospitals refuse to admit patients due to irregular supply of oxygen zws 70
Next Stories
1 सातारा, वाई, महाबळेश्वरमध्ये वादळी पाऊस, दोघांचा मृत्यू
2 सातारा : महाबळेश्वर, पाचगणी, वाई, खंडाळ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
3 Coronavirus : राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन करोनाबाधित, ६६९ रूग्णांचा मृत्यू
Just Now!
X