तब्बल ४८ तासांनंतर महाड मधील पूरस्थिती ओसरण्यास सुरूवात झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने महाडकरांना दिलासा मिळाला आहे. सावित्री नदीची पूर पातळी मध्यरात्री १ वाजता १०.५० मीटरवर पोहोचली होती. ती सकाळी आठ वाजता ७.५० मीटर पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे मदत व बचाव कार्य पुन्हा एकदा सुरु झाले आहे.

एनडीआरएफ, तटरक्षक दल, कोलाड येथील रिव्हर राफ्टींग टीम्स महाड परिसरात दाखल झाल्या आहेत. नौदलाचे पथकही महाड येथे पोहोचले आहे. तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स महाड मध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे मदत व बचाव कार्याला सुरवात झाली आहे. मात्र मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी अजूनही पाणी असल्याने वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. मोबाईल आणि टेलिफोन सेवा अजूनही विस्कळीत आहे. वीज पुरवठा खंडीत आहे.

रायगड : पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू!

माणगाव पाचाड मार्गावर कोसळलेली दरड हटविण्यात प्रशाससनाला यश आले आहे. त्यामुळे महाडकडे येणारा एक रस्ता मोकळा झाला आहे. आता मदत व बचाव पथकांना आपतग्रस्त ठिकाणी पोहोचणे शक्य होणार आहे.

२५ जुलै २००५ रोजी महाड मध्ये महापूर आला होता. त्याहूनही मोठा महापूर महाडकरांनी यंदा अनुभवला. जवळपास संपूर्ण शहराला पूराच्या पाण्याने वेढा दिला होता. मात्र आता महाबळेश्वर, पोलादपूर आणि महाड परिसरातील पावसाचा कमी झाला आहे. त्यामुळे पूर ओसरण्यास मदत होणार आहे. २४ तासात महाड येथे १८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.