‘मी निर्दोष आहे. मला पोलिसांनी या गुन्ह्यात गोवले आहे.वाटल्यास मला फाशी द्या, पण तडफडत ठेवू नका…’ सोनई हत्याकांडातील दोषी संदीप कुऱ्हेने न्यायालयात मांडलेली त्याची बाजू. तर दोषींन कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती दोषींच्या वकिलांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी नाशिकमधील जिल्हा सत्रन्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. या प्रकरणात सहा दोषी असून दोषींच्या वतीने तीन वकिल होते. यातील दोन वकिल गुरुवारी न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते. बचावपक्षांच्या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने वकिल अनुपस्थित असल्याने संदीप कुऱ्हेलाच स्वतःची बाजू मांडण्यास सांगितले.

संदीप कुऱ्हे म्हणाला, मी निर्दोष आहे. मला या गुन्ह्यात अडकवण्यात आले. वाटल्यास मला फाशी द्या, पण तडफडत ठेवू नका. जी शिक्षा आहे ती देऊन टाका. पोलिसांनी मला चुकीच्या गुन्ह्यात फसवले. जवळपास अर्धा तास हा युक्तिवाद झाला. सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. सर्वांनी मिळून कट रचला आणि इतके क्रूरपणे हत्या केली. या भयानक क्रौर्यात सर्वांचा सहभाग होता. त्यामुळे सर्वांना एकसारखीच शिक्षा द्यावी, असे निकम यांनी सांगितले.

घटनाक्रम
* १ जानेवारी २०१३ च्या सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान
* सातही आरोपी अटक केल्यापासून कारागृहातच, त्यांचा जामीनअर्ज उच्च न्यायालयाने वेळोवेळी फेटाळला.
* प्रथम तपास सोनईचे सहायक निरीक्षक पाटील यांच्याकडे, आरोप झाल्याने नंतर श्रीरामपूरचे उपअधीक्षक गांगर्डे यांच्याकडे, एक महिन्याने सीआयडीचे उपअधीक्षक एस. डी. बांगर, उपनिरीक्षक रऊफ शेख, खलिल शेख व रमेश कालंगडे यांच्या पथकाकडे वर्ग.
* २६ मार्च २०१३ रोजी ९८२ पानांचे दोषारोपपत्र दाखल
* खटल्याची सुरुवातीची सुनावणी नेवासे येथील सत्र न्यायालयात नंतर नाशिककडे वर्ग
* खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती
खटल्यात ५३ साक्षीदारांची तपासणी
* १५ जानेवारी २०१८- न्यायालयाने पोपट उर्फ रघूनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश उर्फ प्रवीण दरंदले, संदीप कुल्हे, अशोक नवगिरेला दोषी ठरवले
* १८ जानेवारी २०१८ – शिक्षेबाबत युक्तिवाद पूर्ण