चढय़ा दरातील बाजरीची खरेदीही थांबली
दिगंबर शिंदे, सांगली
नवीन हंगामातील सुगी सुरू होताच सांगलीच्या बाजारात शाळूच्या दरात क्विंटलमागे ७०० रुपयांनी घट झाली आहे. याचबरोबर चढय़ा दराने बाजरीची खरेदीही थांबली असून गव्हाच्या दरातही ५० रुपयांनी घट आली आहे. नवीन मालाची आवक वाढणार असली तरी गत हंगामापेक्षा कमी आवक राहण्याची चिन्हे असल्याने दर स्थिर राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.
यंदा शाळू ज्वारीचे आगर समजल्या जाणाऱ्या जत, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा या भागात परतीच्या पावसाने दगा दिल्याने अपेक्षित उत्पादन येण्याची शक्यता दुर्मिळ दिसत होती. यामुळे सांगली बाजारात शाळू ज्वारीचे दर ४ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. यंदा दुष्काळी स्थितीमुळे शाळू ज्वारीचे दर अर्धशतक पार करण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र शिल्लक शाळू शेतकऱ्यांनी विक्रीस आणल्याने दर ३ हजार ते ३ हजार ७०० रुपयापर्यंत स्थिरावले होते.
सेवाकराच्या नोटीसा बजावण्यात आल्याच्या विरोधात सांगली बाजार समितीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून बाजार बंद होता. सोमवारपासून पूर्ववत बाजार सुरू झाल्यानंतर शाळू ज्वारीचा दर २ हजार ५०० रुपयांपासून ३ हजार ५०० रुपयापर्यंत मिळाला. बंद सुरू होण्यापूर्वी याच शाळवाचा दर ३ हजार २०० ते ४ हजार २०० रुपये म्हणजेच सरासरी ३ हजार ७०० रूपये क्विंटल असा होता, अशी माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव एन.एम. हुल्याळकर यांनी दिली. सांगलीच्या बाजारात सोमवारी १८० तर मंगळवारी १२८ क्विंटल शाळू ज्वारीची आवक झाली असून गतहंगामाच्या तुलनेत यंदा आवकेच्या प्रमाणात घट आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2019 12:29 am