News Flash

महाबळेश्वरमध्ये काळय़ा गव्हाची पेरणी!

जपान आणि भारतीय गव्हाच्या संकरातून नवे वाण

जपान आणि भारतीय गव्हाच्या संकरातून नवे वाण

विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : गहू लागवडीच्या विविध प्रयोगासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये काळय़ा गव्हाची पेरणी करण्यात आली आहे. जपान आणि भारतीय गव्हाचे संकर करून तयार केलेले हे ‘एनबीएमजी’ नावाचे वाण असून त्यातील घटक हे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. महाबळेश्वर येथे दहा एकर क्षेत्रावर या काळय़ा गव्हाची प्रायोगिक तत्त्वावर नुकतीच पेरणी केली आहे.

महाबळेश्वरचे भौगोलिक स्थान आणि हवामान हे गहू लागवडीसाठी पोषक असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपासून गव्हाच्या लागवडीचे विविध प्रयोग केले जातात. यातूनच येथे गव्हावर संशोधन करण्यासाठी ‘गहू गेरवा’ या संस्थेचीही स्थापना करण्यात आलेली आहे.

मोहाली येथील संशोधन केंद्रामध्ये डॉ. मोनिका गर्ग या कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाचे हे नवीन वाण शोधून काढले आहे. जपान येथील काळा गहू व भारतीय गव्हाचा संकर करत ही नवीन जात तयार केली आहे. या काळय़ा गव्हाची महाबळेश्वर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे यांच्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर पेरणी करण्यात आली आहे.

एक गुंठय़ाला एक किलो याप्रमाणे दोनशे किलो बी पेरण्यात आले आहे. अजून दोनशे किलो बियाण्यांची शेतकऱ्यांकडून मागणी करण्यात आली आहे. या गव्हाच्या बियाण्याचा दर एकशे वीस रुपये प्रति किलो असा असून वाहतूक खर्चासह त्यास किलोमागे दीडशे रुपये दर पडत आहे.

नेहमीच्या गव्हापेक्षा पौष्टिक

आपल्या नेहमीच्या गव्हापेक्षा हा काळा गहू अतिशय पौष्टिक आहे. त्यात मॅग्नेशियम, आयर्न, झिंक आधी घटकांचे प्रमाण चांगले आहे. या उपयुक्त घटकांमुळे मधुमेह, लठ्ठपणा, ताण तणाव इत्यादी आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 1:11 am

Web Title: sowing of black wheat in mahabaleshwar zws 70
Next Stories
1 महाबळेश्वर येथे विहिरीत गवा पडला ; बचाव कार्य सुरु
2 राज्यात आज ३,५५८ नव्या करोनाबाधितांची नोंद
3 क्रिकेट खेळताना झाला वाद; डोक्यात बॅट मारल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
Just Now!
X