जिल्ह्यातील सर्वच १६ तालुक्यांमध्ये शनिवारी रात्री परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने ऐन सोयाबीन काढणीच्या कामात अडथळा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील २४ तासात नांदेड तालुक्यात सर्वाधिक ५१.५७ मि.मी. पाऊस झाला असून जिल्हाभरात २१४.१० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने मराठवाड्यात तीन दिवसांत पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी रात्री पावसाने देगलूर तालुक्याला अक्षरश झोडपून काढले. अनेक भागात सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन काढून ढिगारे शेत शिवारात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता शेतातील सोयाबीन काढणे अवघड झाले आहे.  परिणामी आता सोयाबीनला मोड फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान शनिवारी रात्री बिलोली तालुक्यात ढगफुटी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तालुक्यातील १३ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात देखील पावसाचा जोर कायम असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात येत होते. त्यामुळे रविवारी सकाळी विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला असल्याची माहिती देण्यात आली.

मागील २४ तासांत नांदेड तालुक्यात ५१.५७ मिमी. पावसाची नोंद झाली, तर मुदखेड-१६, अर्धापूर- ०६, भोकर-३३, उमरी-३१.३३, कंधार- २२.५०, लोहा-२१.३३, किनवट- ०१, माहूर-०१.२५, हदगाव ०६.५७, हिमायतनगर-००.३३, देगलूर- ०३, बिलोली – निरंक, धर्माबाद-१६.६७, नायगाव तालुक्यात ०१.८० तर मुखेड तालुक्यात ०१.५७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यत मागील २४ तासात २१४.१० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.