एकदाचे मतदान सरले. आता चर्चा व उत्सुकता कोण निवडून येणार? कोणाला कोठून किती मताधिक्य मिळणार? आकडेमोडीसह गणित मांडले जात आहे. मात्र, याच्याच भांडवलावर चक्क सट्टाबाजारही तेजीत आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी ‘मीच निवडून येणार, लावा पजा’, असे जाहीर करताच राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकत्रे जाहीरपणे लाखो रुपयांच्या पजा लावण्याचे आव्हान परस्परांना देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पडद्याआड चालणारा सट्टाबाजार पजेच्या माध्यमातून जाहीररीत्या सुरू झाला आहे. एक लाखापासून ११ लाखांपर्यंत पजेचे आव्हान देणाऱ्या कार्यकर्त्यांकडे एवढा पसा आला कुठून? यावर प्रशासकीय यंत्रणेनेही आता नजर एकवटली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गोपीनाथ मुंडे व राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यासह ३९ उमेदवारांचे भवितव्य गेल्या १७ एप्रिलला मतदानयंत्रांत बंद झाले. मुंडे यांच्यामुळे राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीत मुंडे की धस निवडून येणार, यावर आता आकडेमोड सुरू झाली आहे. राज्यभरातून या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे समर्थक या साठी सट्टा लावत असल्याने हा बाजारही चांगलाच तेजीत आला आहे. सट्टाबाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार मुंडे यांना ६५ पसे, तर धस यांना १ रुपया १५ पसे असा भाव मिळत असल्याचे सांगितले जाते. सट्टाबाजारात ज्याचा भाव कमी तो विजयी होण्याची शक्यता जास्त असते.
पडद्याआड सुरू असलेल्या या सट्टाबाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाच राष्ट्रवादीचे उमेदवार धस यांनी आष्टीत पत्रकार बैठकीत बोलताना आपणच ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार, असा दावा केला. मात्र, हे सांगतानाच कार्यकर्त्यांनी यावर पजा लावाव्यात. आपण हरलो तर आपल्याकडून पसे घेऊन जावेत, असे जाहीर आव्हान देऊन टाकले! त्यामुळे भाजपचे नेते फुलचंद कराड यांनीही लगोलग पत्रक काढून मुंडेच निवडून येणार, धस यांनीच आपल्याबरोबर १० लाखांची पज लावावी, असे प्रतिआव्हान दिले. कराड यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देताना राष्ट्रवादीचे माणिक फड व अनुरथ सानप यांनी ‘िहमत असेल तर कराडांनी ११ लाखांची पज लावावी. पसे कुठे ठेवायचे ते सांगा,’ असे प्रतिआव्हान दिले.
स्थानिक वृत्तपत्रातून लाखो रुपयांच्या पजा लावण्याचे पत्रकयुद्धच सुरू झाल्याने सट्टाबाजारातही भाव वाढला आहे. पजेच्या पडद्याआड एक प्रकारे जाहीर सट्टाबाजारच सुरू झाला आहे. या सट्टय़ासाठी कार्यकर्त्यांकडे लाखो रुपये कुठून आले, यावर आता जिल्हा प्रशासनाने नजर वळविली आहे.