News Flash

गाडी कधी चालू होणार हो?

गतिमंद महिला आठ महिन्यांच्या मुलीसह दहा दिवसांपासून बस स्थानकात

रवींद्र केसकर

एरवी माणसांच्या अफाट गर्दीने गजबजलेले बस स्थानक ओस पडले आहे. येथील भयाण शांततेने दिवसादेखील मनात धडकी भरते आहे.  स्थानकच  दहा दिवसांपासून गतिमंद कविता आणि तिच्या आठ महिन्यांच्या निरागस मुलीचा आधार बनले आहे. रात्रीच्या काळोखात निराधार आईचे उसासे आणि तिच्या मुलीचे हृदय पिळवटून टाकणारे रडू याखेरीज दुसऱ्या कोणाचीच सोबत नाही. टाळेबंदीत पुण्यातून आलेली कविता इथे अडकून पडली. डोळ्यांत सारा जीव गोळा करून ती एकच प्रश्न विचारते, गाडी कधी चालू होणार आहे हो?

कविताचे वय साधारण वीसएक र्वष असेल. तिचा नवरा पुण्याचा आहे. आता तो बघत नाही, त्याने सोडून दिले आहे मला. राजस्थानी आहे. उमेश त्याचे नाव.. अशी काहीतरी बडबड ती सतत करते. गतिमंद असलेल्या कवितासोबत आठ महिन्यांची चुणचुणीत मुलगी आहे. महक असे तिचे नाव असल्याचे सांगते. मागील दहा दिवसांपासून गतिमंद असलेली कविता आणि निरागस महक दोघींचा मुक्काम उस्मानाबाद शहरातील बस स्थानकात आहे. एरवी अफाट गर्दीने गजबजलेले हे स्थानक टाळेबंदीनंतर ओस पडले. एक-दोन निराधार फिरस्ते सोडले तर बस स्थानकाकडे सध्या कोणीच फिरकत नाही. रात्रीच्या भयाण काळोखात तर या दोघींना केवळ एकमेकींचाच आधार. गतिमंद आईचे उसासे अन् पोटभरून दूध न मिळाल्याने सारा आसमंत पिळवटून टाकणारे उपाशीपोटी महकचे रडणे. दोघीही रडून थकतात आणि थकून शांत होतात. एकमेकींना दिलासा देत, एकमेकींचे मनोरंजनही दोघीच करतात.

पुण्यात नवऱ्याकडे गेलेल्या कविताला त्याने झिडकारले. तान्हुल्या महकची देखील त्याला काळजी वाटली नाही. पंढरपूर येथे कविताच्या मामाची मुलगी राहते. किमान ती तरी आधार देईल म्हणून पुण्याहून पंढरपूरला निघालेली कविता मजल दरमजल करीत उस्मानाबाद येथे पोहचली आणि नेमकी त्याच दिवशी टाळेबंदी जाहीर झाली. कविताचे मानसिक वय आणि महकचे शारीरिक वय जवळपास सारखेच. त्यामुळे आजूबाजूला काय सुरू आहे हे त्या दोघींनाही उमजेना. इथे आलो तेव्हा भरपूर गाडय़ा आणि खूप माणसे होती. आता अचानक सगळे कुठे गेले, असा प्रश्न कविताचा डोळ्यांत उभा आहे. तिला धड ते व्यक्तही करता येत नाही. मागील चार दिवसांपासून शंकर डिसले आणि प्रदीप यादव तिला मोफत शिवभोजन आणून देत आहेत. कुणी महकसाठी दूध आणून देतो, मात्र हे सगळे तात्पुरते आहे. दोघींना हक्काचा आधार नाही की हक्काची माणसे. आई-वडील कुठे आहेत असे तिला विचारले तर बराच वेळ ती शांत होती. मेंदू मंद असला तरी हृदयाला प्रश्न कळला असावा. डोळ्यांच्या कडा क्षणात ओल्या झाल्या. आई मेली अन् बाप कुठे आहे ते माहीत नाही असे सांगून बराच वेळ ती शांत राहिली. कळवळून रडणाऱ्या महकच्या आवाजाने ती भानावर आली. मला पंढरपूरला जायचे आहे. गाडी कधी चालू होणार आहे हो? एवढा एकच प्रश्न किती तरी वेळ ती विचारत होती. बाहेरच्या जगात एका संसर्गजन्य विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटाची तिला अजिबात जाणीव नाही. आई-वडिलांच्या मायेला मुकलेली आणि नवऱ्याच्या आधारविना निराधार झालेली गतिमंद कविता आपल्या निरागस मुलीला तरी हक्काचा आधार मिळावा यासाठी  पंढरपूरच्या पांडुरंगाला जाऊ  इच्छित आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा ती एकच प्रश्न विचारत आहे. गाडी कधी चालू होणार आहे हो?

अचानक सगळे कुठे गेले?

इथे आलो तेव्हा भरपूर गाडय़ा आणि खूप माणसे होती. आता अचानक सगळे कुठे गेले असा प्रश्न कविताचा डोळ्यांत उभा आहे. तिला धड ते व्यक्तही करता येत नाही.  चार दिवसांपासून शंकर डिसले आणि प्रदीप यादव तिला मोफत शिवभोजन आणून देत आहेत. कुणी महकसाठी दूध आणून देतो, मात्र हे  तात्पुरते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:18 am

Web Title: speedy woman with an eight month old girl in the bus station for ten days abn 97
Next Stories
1 फटाके फोडल्यामुळे सोलापूर विमानतळ परिसरात आग
2 जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार दादाराव केचेंवर गुन्हा दाखल
3 जमाबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी आमदारास नोटीस, पोलीस मात्र अनभिज्ञच
Just Now!
X