सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पावसाने हुलकावणी दिली. मोसमी पाऊस कोकणात येऊन थडकला असल्याचे वेधशाळेचे म्हणणे असले, तरी आज सकाळी सरासरी २.३४ मि. मी. एवढाच पाऊस नोंदला आहे. गेल्या सहा दिवसांत जिल्ह्य़ात सरासरी २९.३९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.मोसमी पाऊस कोकणात थडकला असल्याचे वेधशाळेने म्हटले असले तरी या पावसाला जोर नसल्याचे जाणवत आहे. हा पाऊस तुरळक ठिकाणी कोसळत असल्याने तो हंगामी पाऊस नव्हे असे बोलले जाते.
गुरुवारी सकाळी जिल्ह्य़ात कालपासून कोसळलेल्या पावसाची नोंद १८.७० मि. मी. म्हणजेच सरासरी २.३४ एवढीच आहे. आठपैकी चार तालुक्यांत पाऊस कोसळलाच नाही, असे जिल्हा आपत्कालीन कक्षात नोंदविले आहे.
१ जूनपासून पावसाचा हंगाम सुरू होत असल्याचे मानून जिल्हा यंत्रणा पावसाची नोंद करत आली आहे. गेल्या सहा दिवसांत २३५.१२ मि. मी. म्हणजेच सरासरी २९.३९ एवढी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्य़ात तालुकानिहाय कोसळलेला पाऊस वैभववाडी ९० मि. मी., वेंगुर्ले ३० मि. मी., मालवण ४३ मि. मी., सावंतवाडी २८ मि. मी., दोडामार्ग १६ मि. मी., देवगड ११ मि. मी., कुडाळ ९ मि. मी., कणकवली ७.७० मि. मी. मिळून २३५.१२ मि. मी. एवढा एकूण जिल्ह्य़ात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पावसाचे ढग दाटून येतात, पण काही काळात हे ढग हुलकावणी देत असल्याचे बोलले जात आहे. आंबोली घाट दरड भागातील दगड रस्त्यावर येण्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे.