16 October 2019

News Flash

एसटीच्या ‘लाल परी’लाच प्रवाशांची पसंती

अन्य बस सेवांच्या तुलनेत साध्या बसचे प्रवासी भारमान जास्त

संग्रहित छायाचित्र

|| सुशांत मोरे

अन्य बस सेवांच्या तुलनेत साध्या बसचे प्रवासी भारमान जास्त

राज्याच्या कानाकोपऱ्यात गेली सात दशके सातत्याने प्रवासी सेवा पुरवणाऱ्या एसटी महामंडळाची साधी बस म्हणजेच लाल परी अद्यापही प्रवाशांच्या पसंतीस आहे. एसटीच्या एकूण प्रवासी भारमानात दिवसा धावणाऱ्या साध्या बसचे भारमान ७२ टक्के तर रातराणी साध्या बसचे ६४ टक्के गणले जाते. त्या तुलनेत शिवशाही, शिवनेरी, मिडी, हिरकणी बस सेवांचे प्रवासी भारमान कमी भरते. त्यामुळे राज्यातील ज्या-ज्या मार्गावर या नव्या किंवा अद्ययावत सेवांचे प्रयोग अयशस्वी ठरले, तेथे पुन्हा लाल डबा चालवण्याशिवायही एसटी महामंडळाला पर्याय राहिला नाही.

एसटीकडून आता नवीन प्रकारच्या साध्या रातराणीत बदल केले जाणार असून यात आसन व शयनयान हे दोन्ही प्रकार एकाच बसमध्ये असलेली सेवा लवकरच आणली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

साधी बस (परिवर्तन)

बस गाडय़ा- १५,९००

प्रवासी भारमान- ७२ टक्के

साध्या बसला ग्रामीण भागात लाल डब्बा, लाल परी म्हटले जाते. एसटीच्या एकूण उत्पन्नात याचा सर्वाधिक वाटा आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन परिवर्तन बसेस माइल्ड स्टीलच्या मजबूत बांधणीमध्ये तयार केल्या जात आहेत.

 

रातराणी (साध्या बस गाडय़ा)

बस गाडय़ा- ३१०

प्रवासी भारमान- ६४ टक्के

लांब पल्ल्याचा रात्रीचा प्रवास करणाऱ्या साध्या बस गाडय़ांना रातराणी संबोधले जाते. सध्या २९० मार्गावर रातराणी सेवा सुरू आहे. एसटीच्या नव्या धोरणानुसार रातराणी सेवा प्रकारात विनावातानुकूलित स्लिपर आणि सीटर बसचा नवा प्रयोग केला जाणार आहे. यात ३० आसन व १५ शयनकक्षाची रचना असेल.

 

मिडी बस (यशवंती)

बस गाडय़ा- २४५

प्रवासी भारमान- १४ टक्के

जून २०१०च्या सुमारास दुर्गम भागांमध्ये चालवण्यासाठी मिडीबस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. ३५ आसने असलेली हिरव्या रंगाची छोटेखानी बस अल्पावधीतच लोकप्रिय झाली. परंतु बसची दुरुस्ती व देखभाल खाजगी कंपनीकडे असल्यामुळे वेळेच्या वेळी या बसेस दुरुस्त होऊ न शकल्याने लवकरच त्या सेवेतून बाद झाल्या.

 

हिरकणी (निमआराम)

बस गाडय़ा- ९३९

प्रवासी भारमान- ६६ टक्के

१९८२ पासून वापरण्यात आलेल्या या बस दादर ते पुणे मार्गावर चालवण्यात आल्या. १,१०० निमआराम बस गाडय़ांची संख्या आता ९३९ पर्यंत आणली आहे.

 

शिवनेरी वातानुकूलित

बस गाडय़ा- १२३

प्रवासी भारमान- ५० टक्के

वातानुकूलित शिवनेरी बस गाडय़ा २००२ पासून सेवेत आल्या. मुंबई ते पुणे, पुणे ते औरंगाबादसह एकूण नऊ मार्गावर शिवनेरी सेवा आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.  मुंबई ते गोवा, कोल्हापूर, सांगलीसह अन्य मार्गावर प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा बंद केली आहे.

 

शिवशाही वातानुकूलित

बस गाडय़ा- १,०३०

प्रवासी भारमान- ५२ टक्के

२०१६ रोजी पहिली वातानुकूलित शिवशाही मुंबई ते रत्नागिरी मार्गावर चालवण्यात आली. परंतु अपघात, नादुरुस्ती या कारणांमुळे ही सेवा अधिक चर्चेत राहिली. मे २०१८ पासून  शयनयान सेवाही सुरू केली. परंतु ४२ मार्गापैकी बहुतांश दुष्काळ भागांत ही महागडी सेवा सुरू केल्याने त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दहा मार्गावरील शयनयान सेवा बंद केल्या असून साध्या बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

First Published on April 15, 2019 12:59 am

Web Title: st in maharashtra