01 October 2020

News Flash

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसांत बसवणार!

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी व हुक्केरीचे तहसीलदार यांचे मनगुत्तीच्या ग्रामस्थांना आश्वासन

मनगुत्ती गावातील आक्रमक शिवप्रेमी नागरिक

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा हटवण्याचे संतप्त पडसाद महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये रविवारी पाहायला मिळाले. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलन आणि मनगुत्ती गावात दिवसभर ठिय्या आंदोलन केल्याने तणाव निर्माण झाला होता. मनगुत्ती मधील मराठी भाषकांनी पुतळा बसवण्यासाठी आंदोलन केल्याने त्याची गंभीर दाखल कर्नाटक शासनाने घेतली. गावातील मान्यवरांशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी व हुक्केरीचे तहसीलदार यांनी चर्चा केली. सायंकाळी त्यांनी पुतळा आठ दिवसात सन्मानाने बसवण्यात येईल, अशी ग्वाही दिली. याची कार्यवाही झाली नाही तर नवव्या दिवशी पुतळा गावकरी उभारतील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला.

मनगुत्ती गावातील शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करून रातोरात काढला होता. दुसऱ्या एका गटाने तक्रार केल्याने पुतळा हटवल्याचे कर्नाटक प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र हा पुतळा काढल्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या कोत्या भुमिकेविरोधात आवाज उठू लागला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुतळा पुन्हा बसवण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आज कागल येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली. उद्या मनगुत्तीमध्ये घुसून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रमुखांनी दिला आहे.  दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनीही कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला आहे. आज मनगुत्ती गावातील मराठी भाषिकांनी आक्रमक भूमिका घेतली. गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करत पुतळा पुन्हा बसावावा, अशा जोरदार घोषणा सुरू केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सायंकाळी अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात सन्मानाने बसवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 8:03 pm

Web Title: statue of chhatrapati shivaji maharaj to be installed in eight days msr 87
Next Stories
1 अलिबाग – मुंबई बोट रुग्णवाहिका सुरु होणार
2 वर्धा : वृक्षतोडी विरोधात आज क्रांतिदिनी पर्यावरणप्रेमींनी फुंकला आंदोलनाचा बिगुल
3 शिवसेनेने आंदोलन जरूर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही? याचं उत्तर द्यावं : शेलार
Just Now!
X