नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वसई:  वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे विविध ठिकाणच्या भागात श्वानदंशाच्या व हल्ला करण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भटक्या श्वानांना नियंत्रणात आणण्यासाठी पालिके च्या निर्बीजीकेंद्रामार्फत प्रयत्न केले जातात. परंतु टाळेबंदीच्या काळात हे काम थंडावले आहे. त्यामुळे वसई विरार शहरात भटक्या श्वानांची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेसुद्धा कठीण झाले आहे. मागील काही दिवसांपासून नायगाव पूर्वेतील परिसरात भटक्या श्वानांनी हैदोस घातला आहे. जूचंद्र येथील परिसरात श्वान दंश होण्याच्या घटना वाढतच आहेत. नुकताच एका श्वानाने  तीन वर्षीय मुलीवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात मुलगी श्रद्धा गुप्ता (३) ही गंभीर जखमी झाली असून चेहऱ्यावरच हल्ला केल्याने तब्बल १८ टाके  पडले आहेत. तर दुसरीकडे  ९ वर्षीय मुलगी हिमांशी माळी  हिच्यासुद्धा हातावर श्वानदंश झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.

तसेच रस्त्यावरून चालताना ही भटके श्वान मागून येऊन पटकन चावा घेत आहेत. मागील पाच ते सहा दिवसांत अनेकांना श्वान दंश झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.  या भटक्या श्वानांना खाण्यासाठी  काही मिळत नसल्याने गावामध्ये शिरकाव करू लागले आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. या श्वानांना लगाम घालण्यात यावा यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लस ही लवकर उपलब्ध होत नाही

श्वान दंश झाल्यानंतर अनेकजण जवळच्या शासकीय रुग्णालयात धाव घेतात. परंतु जवळच्या रुग्णालयात पटकन लस उपलब्ध होत नाही त्यामुळे नागरिकांना इकडून तिकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. नुकताच जूचंद्र येथील पालिकेच्या आरोग्य तपासणी केंद्रात श्वान दंश झाल्यानंतर गेले असता रुग्णांना लस उपलब्ध नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे वसईत जावे लागले.  सध्या करोनाकाळ सुरू अशात वसईच्या ठिकाणी ये-जा करण्यास सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येत आहेत. यासाठी जवळच्या आरोग्य केंद्रातही ही लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ज्या ठिकाणी भटक्या श्वानांचा उपद्रव आहे. त्या ठिकाणी नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील.

— निलेश जाधव, सहायक आयुक्त स्वच्छता व आरोग्य विभाग