|| निखिल मेस्त्री

नियंत्रणात नगर परिषदेला अपयश

पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये भटक्या श्वानांनी हैदोस घातला आहे. समूहाने हे भटके श्वान संपूर्ण शहरभर ठिकठिकाणी फिरत असल्यामुळे नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. याचबरोबरीने या श्वानांमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी पालघर नगर परिषदेमार्फत दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, मात्र त्यानंतरही संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. गेल्या वर्षी निर्बीजीकरण ठेका नसल्याने व यंदा टाळेबंदी यामुळे भटक्या श्वानांची संख्या कमालीची वाढल्याचे दिसून येते. पालघर नगर परिषद हद्दीमध्ये किती भटके श्वान आहेत, याची नोंद नगर परिषदेकडे नसल्याचे सांगण्यात येते. ठेका दिल्यानंतर किती श्वानांचे निर्बीजीकरण केले याची माहितीही उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. पालघर शहरात सर्वात जास्त भटके श्वान हे पालघर-माहीम रस्ता परिसरात दिसून येतात. हे श्वान पदपथावर, गल्लीबोळात, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात समूहाने वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर त्यांच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकाही निर्माण झाला आहे. सोसायट्या, दुकाने, सार्वजनिक ठिकाणी हे श्वान नैसर्गिक विधी करीत असल्याने शहरभर त्याची दुर्गंधी येत असून त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

शहरात असलेल्या गृहनिर्माण संस्था यांचा निघणारा ओला कचरा सफाई कर्मचारी एका बंद पेटीत ठेवत असले तरी कचरा टाकलेल्या पिंपात अन्नाच्या शोधात असलेले भटके श्वान तोंड खुपसून तो पूर्ण कचरा अस्ताव्यस्त करीत आहेत. संख्या वाढू नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा या भटक्या श्वानांची संख्या बेसुमार होईल व याचा मोठा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. या श्वानांमुळे अस्वच्छता पसरली जात असल्याने परिसर व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लेप्टोस्पायरोसिस आजाराची भीती

भटके श्वान उघड्यावर नैसर्गिक विधी करीत असल्यामुळे त्यापासून मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्या शरीरावरील गोचीड, पिसवा अशा लहान कीटकांमुळे काँगो, गोचीडजन्य आजार बळावण्याची शक्यता आहे. मलमूत्रातून लेप्टोस्पायरोसिस आदी आजार बळावण्याची मोठी शक्यता आहे. ज्यांना त्वचेचा आजार आहे अशांसाठीही भटके श्वान धोकादायक ठरू शकतात. अन्नासाठी श्वानांकडून ओला कचरा विखुरला जात असल्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणासाठीची निविदा प्रक्रिया पार पडली असून त्यासाठी नगर परिषद करारनामा करीत आहे. भविष्यात भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र   प्रस्तावित आहे. – स्वाती देशपांडे – कु लकर्णी, मुख्याधिकारी