देयकावरुन झालेल्या वादाचा नागरिकांना फटका

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : शहरातील रस्त्यांवरील अनेक ठिकाणचे पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. तक्रार करुनही त्याची दुरुस्ती होत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून प्रवास करावा लागत आहे. नगरपंचायत आणि पथदिवे बसविणाऱ्या कंपनीमध्ये देयकावरुन वाद निर्माण झाल्याने दुरुस्तीचे काम रखडले असल्याचे सांगितले जाते.

पथदिव्यांचे काम करणाऱ्या एस एल कंपनीने पथदिवे लावण्याचे व देखभाल दुरुस्तीचे २० लाखांचे देयक नगरपंचायतीला दिले आहे.  करारात नमूद केलेल्या काही बाबींची पूर्तता कंपनीकडून झाली नसल्याने करारातील बाबींची पूर्तता करावी, त्यानंतर हे देयक अदा केले जाईल, अशी भूमिका नगरपंचायतीकडून घेण्यात आली आहे.

वाडा शहरात  कंपनी सोबत करार करण्यापूर्वी   एकूण ६३० पथदिवे अस्तित्वात होते.  करार झाल्यानंतर  कंपनीकडून शहरात एकूण ११४२ एल ई डी पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून यातील २०० च्या वर पथ दिवे बंद आहेत.

करारानुसार बंद झालेले पथ दिवे २४ तासाच्या आत बदलणे कंपनीला बंधनकारक आहे, मात्र ते बदलण्यात आलेले नाहीत. काही वेळा शहरातील काही पथ दिवे दिवसाही सुरूच असल्याची नागरिकांची तक्रार कंपनीकडून वाडा शहरात नव्याने पथ दिवे बसविण्यात आले असून त्याचे एका वर्षांचे देयक देण्यात आले आहे, मात्र देयकाची रक्कम अजून मिळाली नाही. ती मिळताच उर्वरित काम केले जाईल.

-पंकज खताल, प्रकल्प अधिकारी, इ.इ. एस एल कंपनी

शहरातील अनेक  पथदिवे बंद असल्याने  या ठिकाणी रात्री अंधाराचा गैरफायदा घेऊन शहरात एखादी अप्रिय घटना घडू शकते. याबाबत तोडगा काढून नागरिकांची गैरसोय दूर करावी.

– विशाल मुकणे, नागरिक वाडा.

 इ इ एस एल कंपनीच्या सेवेमध्ये काही त्रुटी आहेत. त्या दुर करुन  करारातील अन्य बाबींची पूर्तता केल्यानंतर देयक अदा केले जाईल.

– गीतांजली कोळेकर, नगराध्यक्ष, वाडा नगरपंचायत