आश्वासन देऊनही पाणीपुरवठा होत नाही म्हणून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी महिला सरपंचासह ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना कोंडून घालण्याचा प्रकार मिरज तालुक्यातील टाकळी येथे घडला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने या सर्वाची मुक्तता झाली.
टाकळीमधील सुभाषनगर या विस्तारित भागासाठी भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. गेली पाच वष्रे या योजनेचे काम ठप्प असल्याने ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. एक महिन्यात पाणी सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मंगळवारी ग्रामपंचायतीची मासिक सभा होती. या सभेतच ग्रामस्थांनी जाऊन पाण्याबाबतचा जाब विचारला. या वेळी पदाधिकारी व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नाही असे दिसताच कागदपत्रे भिरकावण्याचा प्रकारही घडला. ग्रामस्थांनी सरपंच भारती पाटील, उपसरपंच ऑगस्ट कोरे, ग्रामविस्तार अधिकारी ए. के. पाटील यांच्यासह सर्व सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून बाहेरून दाराला कडी लावली.
याबाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ टाकळीमध्ये धाव घेऊन पदाधिकाऱ्यांची सुटका केली. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.