येथील विलगीकरण कक्षातून पळून गेलेल्या २१ परप्रांतीयांपैकी ९ जणांना पकडण्यात यश आले आहे. उर्वरित १२ जणांचा अद्याप शोध सुरू आहे. विलगीकरण कक्षातून घडलेल्या पलायन प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

टाळेबंदी आणि जिल्हाबंदी आदेश असतानाही महामार्गावरून चालत निघालेल्या शंभरहून अधिक लोकांना ताब्यात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. यातील २१ जण सोमवारी रात्री पळून गेले. त्यांच्या या पलायनामुळे प्रशासन हादरले होते. ही माहिती मिळताच त्यांचा लगोलग शोध सुरू करण्यात आला. यामध्ये यातील ९ जणांचा शोध घेण्यात यश आले आहे. या सर्वाना पुन्हा विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.

उर्वरित १२ जणांचा अद्याप शोध सुरू आहे. पळून गेलेल्या या २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या विलगीकरण कक्षातून यापूर्वीही काही जण पळून गेले होते. परंतु, त्यांना पुढे जाण्यास वाहन, जेवण, निवासाची सोय न झाल्याने ते पुन्हा विलगीकरण कक्षात परतले होते. तरी, याचा विचार करून जेथे विलगीकरण करण्यात आले आहे, तेथेच थांबून राहणे संबंधितांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे यापुढे कोणीही पळून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना पोलीस सहनिरीक्षक अशोक भापकर म्हणाले, की प्रशासनाने विलगीकरण केलेल्या लोकांनी आहे तेथेच थांबणे गरजेचे आहे. त्यांनी आपली जागा सोडल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केले जातील. एखाद्याच्या अशा कृतीमुळे लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण होईल. तरी, क्वॉरंटाइन केलेल्यांनी पळून न जाता, आहे तेथेच थांबून सहकार्य करावे.