|| मोहन अटाळकर

अमरावती : राज्यात यंदा गाळप सुरू असलेल्या सुमारे १३९ साखर कारखान्यांनी आतापर्यंत १ कोटी ९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असताना त्यात विदर्भाचा वाटा केवळ १ टक्का असल्याचे वास्तव समोर आले असून विदर्भातील पाच कारखान्यांनी घेतलेले उत्पादन अवघे २ लाख ३२ हजार क्विंटल आहे.

विदर्भातील गाळप क्षमता असलेल्या १२ कारखान्यांपैकी सात कारखाने यंदा बंद असून पाच कारखान्यांनी यंदा हंगाम सुरू केला. हे सर्व साखर कारखाने खाजगी आहेत. साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील बहुतांश साखर कारखान्यांनी डिसेंबरमध्ये उसाचे गाळप सुरू केले. आतापर्यंत २.६४ लाख उसाचे गाळप या कारखान्यांनी केले असून २.३२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. उतारा ८.५८ टक्के आहे. हंगाम संपण्यास अजून तीन महिन्यांचा अवकाश असला, तरी विदर्भातून साखरेच्या उत्पादनाचा वाटा इतर भागांच्या तुलनेत वाढण्याची कोणतीही शक्यता नाही.

राज्यात ७४ सहकारी आणि ६५ खाजगी साखर कारखान्यांमधून सद्य:स्थितीत उत्पादन घेतले जात आहे. १ कोटी ९० लाख मे.टन उसाचे गाळप आणि १ कोटी ९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. साखरेचा उतारा आतापर्यंत १०.१७ टक्के आला आहे. सर्वात कमी उतारा नागपूर विभागाचा असून तो फक्त ८.१२ टक्के आहे.

अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यातील सागर वाईन डेक्कन, सुधाकरराव नाईक (नॅचरल शुगर्स) तसेच नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यातील महात्मा, नागपूर जिल्ह्यातील व्यंकटेश्वरा, भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा या पाच कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. सर्वाधिक ४ लाख १८ हजार मे.टन उसाचे गाळप आणि ३ लाख ६५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेत वैनगंगा कारखान्याने विदर्भात अग्रक्रम मिळवला आहे. सागर वाइन डेक्कनने ४२ हजार ५० क्विंटल, सुधाकरराव नाईक (नॅचरल शुगर्स) कारखान्याने १ लाख २३ हजार, महात्मा साखर कारखान्याने १ लाख क्विंटल, व्यंकटेश्वरा कारखान्याने २० हजार १५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

दशकभरापूर्वी सुमारे २४ साखर कारखान्यांची उभारणी करणाऱ्या विदर्भातील साखर उद्योग नामशेष होत चालला असून ज्यांची गाळप क्षमता आहे, अशा कारखान्यांनीही यंदा गाळप सुरू करण्यात उत्साह दाखवलेला नाही, त्यात बुलढाणा जिल्ह्यातील जिजामाता, अनुराधा, वैष्णवी, अमरावती जिल्ह्यातील विदर्भा शुगर, यवतमाळ जिल्ह्यातील जयकिसान, वसंत सहकारी, नागपूर विभागातील स्व. बापुराव देशमुख, पूर्ती, नॅचरल ग्रोअर्स या साखर कारखान्यांचा समावेश आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिती बरी असली, तरी विदर्भाचा साखरेचा वाटा आता नगण्य झाला आहे. अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडल्यानंतर खाजगी उद्योजकांनी ते चालवण्यास घेतले, तरी विदर्भात केवळ पाच खाजगी कारखान्यांनीच हंगाम सुरू करण्याची हिंमत दाखवली आहे.

विदर्भात एका हंगामात अलीकडच्या काळात सुमारे ८ ते ९ लाख मे.टन उसाचे गाळप होते. उसाची उपलब्धतता मात्र ७ ते ७.५० लाख टनापर्यंतच आहे. केवळ १८ हजार हेक्टर क्षेत्रातच उसाची लागवड आहे. यंदा केवळ ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्रात नवीन उसाची लागवड झाली आहे.

विदर्भात वीस कारखान्यांची उभारणी दशकभरापूर्वी करण्यात आली होती. पण मध्यंतरीच्या काळात कारखाने आजारी होऊन बंद पडले. काही कारखान्यांना तर एकाच गाळप हंगामानंतर टाळे लागले. १७ सहकारी साखर कारखान्यांपैकी ११ कारखाने खाजगी उद्योजकांना विकण्यात आले. उर्वरित सहा कारखान्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखाना एकटा सुरू होता, त्याचेही गाळप बंद झाले आहे.

विदर्भात सहकारी साखर कारखान्यांना दशकभरात घरघर लागली आणि या कारखान्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले. पण, या कारखान्यांपैकी काही कारखाने खाजगी उद्योजकांनी आपल्या ताब्यात घेतले, नंतर हेच कारखाने चांगले चालू लागले. सहकारी कारखान्यांच्या भागधारकांमध्ये याचे आश्चर्य आहे. विदर्भातील कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप होत नाही, ही शोकांतिका ठरली आहे.

विदर्भात सहकारी कारखान्यांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी शेअर्स गुंतविले. कारखान्यासाठी जमिनी दिल्या. आपली परिस्थिती बदलेल, मुलांना कारखान्यात रोजगार मिळेल, या आशेवर कारखान्यांच्या उभारणीसाठी योगदान दिले. पण, सहकारसम्राटांनी कारखाने सुरू झाल्यानंतर व्यवस्थापनाकडे लक्ष दिले नाही. कारखाने बुडाले. बहुतांश कारखान्यांवर कोटय़वधीचे कर्ज असल्याने अवसायनात निघाले. काहींनी ही संधी साधून कारखाने विकले. मात्र विकासाची आस ठेवून असलेले शेतकरी मात्र दुर्लक्षित राहिले आहेत.

१ सध्या विदर्भात पाच खाजगी कारखान्यांमध्ये उसाचे गाळप सुरू आहे. हंगाम अखेरच्या टप्प्यात असताना आतापर्यंत केवळ २.६४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. साखरेचा उतारादेखील राज्यात सर्वात कमी म्हणजे ८.५८ टक्के आहे.

२ विदर्भात १९ सहकारी साखर कारखाने होते, गैरव्यवस्थापनामुळे त्यापैकी ११ कारखान्यांना टाळे लागले आणि त्यांचा लिलाव करण्याची पाळी सरकारवर आली. आता विदर्भात केवळ एकाच सहकारी साखर कारखाना शिल्लक आहे आणि यंदाच्या गळीत हंगामात याही कारखान्यांत गाळप सुरू होऊ शकले नाही.

३  विदर्भात सध्या पाच खाजगी कारखाने सुरू आहेत. त्यांच्यामुळेच विदर्भ साखर कारखानदारीच्या नकाशावर अजूनपर्यंत टिकून आहे. अमरावती विभागातील कारखान्यांची दैनिक गाळप क्षमता ही केवळ ५ हजार मे.टन तर नागपूर विभागातील क्षमता ही ६ हजार २५० मे.टन इतकीच आहे.

४  खाजगी कारखान्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत गाळप क्षमता वाढवली असली, तरी सहकारी साखर कारखानदारीत मात्र अखेरच्या घटका मोजत असल्याचे चित्र दिसून आले आहे.