ऊस दरांवरून सध्या शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे शोषण होणार नाही आणि ऊस कारखाने बंद होणार नाहीत याची काळजी घेत दर मागा असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या औरंगाबाद येथील छत्रपती साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. ग्राहकांना स्वस्त दरांत साखर आणि शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. या दोघांमध्ये समन्वय साधणे सरकारचे काम आहे. ऊस  शेतकऱ्यांसाठी  लाभदायक आहेत, मात्र ते बंद होऊ नयेत याची काळजी ऊस दर मागताना घेतली पाहिजे असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

देशात ८ लाख लीटर पेट्रोल आयात होते. ही आयात थांबवण्यासाठी शेतकरी पर्याय देऊ शकतात यावर विश्वास बसत नव्हता. नागपूरमध्ये साखर कारखान्यात तयार होणाऱ्या इथेनॉलवर बस चालतात. इथेनॉलवर चालणारी बाईकचीही निर्मिती होत असून ती लवकरच बाजारात येईल असेही त्यांनी म्हटले आहे. शंभर टक्के पेट्रोल टाका किंवा इथेनॉल टाका असे पर्याय असणार आहेत त्यामुळे साखर निर्मितीसोबतच इथेनॉल निर्मितीवरही भर देणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात पाणी हा देशातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सिंचन १८ वरून ४० टक्क्यांपर्यंत घेऊन जाणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले. एवढेच नाही तर याचसाठी येत्या दोन वर्षात ७० हजार कोटींचे कामे करणार असल्याचेही ते म्हटले. कॅनॉलचे पाणी पाईपलाईनद्वारे देण्याचा प्रस्ताव असल्याने भू संपादन प्रक्रियेचा प्रश्न निर्माण होणार नाही. पाईपचे पाणी ड्रीपने देण्यात येणार आहे त्यामुळे सिंचन क्षमता वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नदीजोड प्रकल्पाची इतके दिवस चर्चा होती.आता या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाणी हे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धता आणि संपन्नता आणेल असेही त्यांनी म्हटले.