पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवायला सुरूवात केली आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष्य केलं. भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावल्याचं समजतंय. दुसरीकडे, ५६ इंच छातीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने टोमणे मारणाऱ्या शिवसेनेने पहिल्यांदाच त्यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

‘आपण घरात घुसून मारलं आहे. आपल्या सैन्याचा खूप अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५६ इंचाची छाती दाखवून दिली आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. यापूर्वी शिवसेनेकडून नेहमीच भारतीय जवानांवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ले केले की पंतप्रधान मोदी यांच्या ५६ इंची छातीचा उल्लेख करून उपरोधिक टीका केली जायची. आता युती झाल्यावर सारे संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे शिवसेनेने मोदींचे कौतुक केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजपला मैत्री कशी असते ते दाखवून देऊ,असे म्हटले होते. त्या अनुषंगाने सावंत यांनी मोदी यांची प्रशंसा केली आहे. दुसरीकडे, भारतीय वायुसेनेचं अभिनंदन करताना जैशच्या सैतानाला-अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.