नववर्षांच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलासमोर ५ जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. या नक्षलवाद्यांवर  एकूण २७ लाख रुपयांचे बक्षीस होते. शरणागती पत्करलेल्यांमध्ये टिपागड दलमच्या उपकमांडरसह दोन पुरुष व तीन महिला नक्षलींचा समावेश आहे. वर्षभरात १ कोटी ८० लाखांचे बक्षीस असलेल्या ३४ जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे.

शरणागती पत्करलेल्या नक्षलींमध्ये टिपागड दलमचा उपकमांडर अजय ऊर्फ मनेसिंग फागूराम कुळयामी याचा समावेश आहे. कुळयामी २००७ पासून टिपागड दलममध्ये सक्रिय होता. मनेसिंग याच्यावर चकमकीचे १९ , खुनाचे १२  तर जाळपोळीचे ५ गुन्हे दाखल असून ५ लाख ५० हजाराचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते. राजो ऊर्फ गंगा ऊर्फ शकिला सोमाजी तुलावी ही २६ वर्षांची नक्षली २००८ मध्ये टिपागड दलममध्ये सहभागी झाली होती. जुलै २०१५ ते आजपर्यंत प्लाटून क्रमांक ३ मध्ये सदस्यपदी कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे आठ , हत्येचे दोन, जाळपोळीचे दोन गुन्हे दाखल असून ५ लाखांचे बक्षीस होते. सपना ऊर्फ रूखमा दोनू वड्डे (२७) ही ऑक्टोबर २००६ पासून चातगाव दलममध्ये सक्रिय होती. त्यानंतर २०११ पर्यंत धानोरा दलममध्ये कार्यरत होती. जानेवारी २०१२ ते आजपर्यंत प्लाटून क्र. फ५ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे १२, हत्येचे ४, तर जाळपोळीचे चार गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर पाच लाखाचे बक्षीस आहे. गुन्नी ऊर्फ बेहरी ऊर्फ वसंती मनकेर मडावी (३१) डिसेंबर २००७ पासून टिपागडमध्ये सदस्य होती. तिला २०१३ मध्ये टिपागड दलमच्या पीपीसीएम या पदावर पदोन्नती दिली गेली. २०१५ पासून ते आजपर्यंत कंपनी क्रमांक १० च्या सदस्यपदावर ती कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे दोन गुन्हे असून ५ लाख ७५ हजाराचे बक्षीस आहे. सुनील ऊर्फ फुलसिंग सुजान होळी (३८) २००८ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्यपदावर भरती होऊन २०१३ ते आजपर्यंत कंपनी क्र. १० चा सदस्य म्हणून कार्यरत आहे. त्याच्यावर चकमकीचे १२ , हत्येचे ४, जाळपोळीचे ३ अपहरणाचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ५ लाख ७५ हजाराचे बक्षीस होते. या वर्षांत एकूण १ कोटी ८० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ३४ जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे.  इतिहासात पहिल्यांदाच चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण चातगाव दलमने शरणागती पत्करल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रपरिषदेत दिली.