अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याच्या घटनेला साडेतीन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. सुशांतच्या मृत्यूचा कारणाचा सीबीआय तपास करत आहे, तर दुसरीकडे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, या प्रकरणात सुशांतच्या दोन्ही बहिणींवर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी दोघींनीही आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जात असतानाच ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. मात्र, या चौकशीदरम्यान रियानं सुशांतच्या बहिणींविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याची एक बहीण दिल्लीतील डॉक्टराच्या मदतीनं फेक डिस्क्रिप्शन, फेस रेकॉर्ड तयार करत सुशांतला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती, असा आरोप रियानं केला होता. ७ सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंग आणि मितू सिंग या दोघींवर गुन्हा दाखल झालेला आहे.

या दोघींनी गुन्हा रद्द करण्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज एस. एस. शिंदे व एम. एस. कर्णिक यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी उत्तर दाखल करण्यास वेळ मागितल्यानं याचिकेवरील सुनावणी स्थगित केली. या याचिकेवर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

कुटुंबीयांची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत सुशांतच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. “मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणे सुशांतची सख्खी बहीण व त्याचे कुटुंबीय दिल्लीतील डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन आधारे नशेची औषधे त्याला देत होते. सुशांतच्या मुंबईतील प्रॉपर्टीसाठी नैराश्य आणून आत्महत्या करण्यास त्याला त्याच्या कुटुंबीयांनी प्रवृत्त केले का? याचा मुंबई पोलिसांनी तपास करावा, अशी मी पोलीस आयुक्तांकडे मागणी करतो,” असं ट्विट आमदार सरनाईक यांनी केलं आहे.